Shivsena Political News I शिवसैनिक आक्रमक, सेनेतील 2 दिग्गज नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत'

शिवसैनिक आक्रमक, सेनेतील 2 दिग्गज नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने खळबळ

चिपळूण : शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिवसैनिकांकडून टार्गेट झाले. या बैठकीत पालकमंत्री बदला आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. उत्तर रत्नागिरी भागातील पाच तालुक्यातून पालकमंत्री बदलाच्या मागणीला बैठकीत जोर धरला होता. या भागातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपली खदखद पक्ष नेतृत्वासमोर मांडली त्यामुळे शिवसेनेत खळबळ माजली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 26 मे 29 मे दरम्यान शिव संपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शरद बोरकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज बहादूर शेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह खेड दापोली मंडणगड गुहागर तालुक्याचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मंडणगड, गुहागर खेड दापोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: राऊत-पवार आपापसात भिडले, म्हणाले तिकीट देण्याचा अधिकार कुणाला..?

कार्यकर्त्यांनी तसेच विभाग प्रमुख गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी काय काम केले याविषयी पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. मागील अडीच वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी काय काम केले याचा प्रथम खुलासा करावा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नसल्याने कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटात वाद लावून निघून गेले त्यानंतर पालकमंत्री राष्ट्रीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत. असा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला नको अशी एकमुखी मागणी उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

चिपळूण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम ही मागणी केल्यानंतर उर्वरित तालुक्यातून पालकमंत्री बदलाच्या मागणीला जोर आला. खेड दापोली मंडणगड तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त करत त्यांना बदलण्याची मागणी केली. चिपळूण मधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना विधानसभा निवडणुकीत आपण अप्रत्यक्षरित्या कशा पद्धतीने मदत केली याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावर्डे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर चिपळूण मधील शिवसेनेचे कार्यकर्ते मंत्री सामंत यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्री सामंत शिवसेनेत राहून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले असा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यावेळी तुमच्या मागण्या आम्ही पक्ष नेतृत्वपर्यंत पोहोचवतो अशी ग्वाही सुनील मोरे आणि शरद बोरकर यांनी दिल्या नंतर पदाधिकारी शांत झाले.

हेही वाचा: चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणांना दम, म्हणाले मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट...

दापोली मतदार संघात शिव संपर्क अभियान राबविण्याची जबाबदारी आमदार योगेश कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याची घोषणा शरद बोरकर यांनी केल्यानंतर आमदार कदम समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. अनेकांनी सभागृहातच घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. दापोलीत माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि आमदार योगेश कदम यांचे गट आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीची सूत्रे दळवी यांच्याकडे देण्यात आली होती त्यामुळे शिवसंपर्क अभियान नक्की कोण राबवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र नेतृत्वाकडून योगेश कदम यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती बोरकर यांनी बैठकीत दिली. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या दळवी समर्थकांचे चेहरे फिके पडले होते.

Web Title: Shivsena Activist Demand Of Resign Post Of Uday Samant And Anil Parab In Konkan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top