सेनेसाठी धरले तर चावते, सोडले तर पळते... दापोली नगरपंचायतीत चित्र...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

पक्षादेश झुगारून सेनेच्या चार नगरसेवकांनी दापोली नगरपंचायतीत ठरावाच्या विरोधात मतदान केले तर एक नगरसेविका या सभेला उपस्थितच राहिली नाही.

दाभोळ - पक्षादेश झुगारून सेनेच्या चार नगरसेवकांनी दापोली नगरपंचायतीत ठरावाच्या विरोधात मतदान केले तर एक नगरसेविका या सभेला उपस्थितच राहिली नाही. सातपैकी पाचजणांनी पक्षादेश झुगारून दिला. शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्यावर कारवाई करणार की, त्यांना अभय देणार, याची चर्चा दापोलीत सुरू आहे. या पाचजणांवर कारवाई केली तर नगरपंचायतीमधील सत्ता जाईल. नाही केली तर वेगळा मॅसेज जाईल. त्यामुळे धरले तर चावते, सोडले तर पळते अशी नेतृत्वाची अवस्था होणार आहे. 

दापोली नगरपंचायतीच्या झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्दू बालवाडीसाठी नगरपंचायतीची जागा 99 वर्षांच्या कराराने देण्यासाठी सभेला उपस्थित राहून ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप सुर्वे यांनी शिवसेनेच्या सातही नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावला होता. मात्र, या सभेच्या अगोदर एक दिवस शिवसेना व कॉंग्रेसच्या नगरसेवकांची पार्टी मीटिंग झाली होती. त्यात शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी आपण या ठरावाला विरोध करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गटनेताच विरोध करत असल्याने गटनेत्याच्याऐवजी तालुकाध्यक्षांना हा पक्षादेश शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना बजावावा लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

शिवसेनेच्या एका नेत्याने उर्दू बालवाडीसाठी ही जागा मिळवून देतो, असे आश्‍वासन दिले असल्याची चर्चा दापोलीत सुरू असून याचसाठी नगरसेवकांवर ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी पक्षादेश काढण्यात आला होता; मात्र दापोलीत अशी प्रथा नसल्याने 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये' यासाठी या ठरावाला विरोध करण्यात आला. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना व कॉंग्रेस यांचा प्रासंगिक करार असून या ठरावाला कॉंग्रेसच्या उपनगराध्यक्षांनीही विरोध केला. त्यांना राष्ट्रवादीचे सचिन जाधव व भाजपच्या दोन सदस्यांनी मदत केली. या ठरावाला केवळ नगरपंचायतीमधील 4 मुस्लिम नगरसेविकांनीच पाठिंबा दिला. 

पक्ष नेतृत्व कारवाई करू शकत नाही.. 

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे दापोलीतील शिवसेना बॅकफुटवर गेली असून पक्षादेश झुगारलेल्या पाच नगरसेवकांवर खरोखरच शिवसेनेचे नेतृत्व कारवाई करणार का? यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असून जर या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई केली तर नगरपंचायतीमधील शिवसेनेची सत्ता जाऊ शकते. त्यामुळे पक्ष नेतृत्व कोणतीच कारवाई करू शकत नाही, याची जाणीव या नगरसेवकांना असल्याने गटनेत्यासह चार नगरसेवकांनी हे धाडस केले असावे, अशी चर्चा दापोलीत सुरू आहे. 

बजावलेल्या पक्षादेशात अनेक त्रुटी

 शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप सुर्वे यांनी सेनेच्याच 7 सदस्यांना बजावलेल्या पक्षादेशात अनेक त्रुटी असून तो कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, अशी माहिती राजकीय क्षेत्रातील एका जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. शिवसेनेतील अनेकांना उर्दू बालवाडीसाठी जागा देणे, हे पसंत नव्हते. त्यामुळे हा पक्षादेश काढतानाच त्यात मुद्दाम त्रुटी ठेवलेल्या नाहीत ना, याबाबतही चर्चा सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena poitics in dapoli nagarpanchayt

टॅग्स
टॉपिकस