शिवसेनेचे बडे नेते लवकरच 'भाजप'त येणार?, राजकीय नेत्याचं सूचक वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

राणेंवरील टीका सहन करणार नाही; टिकेशिवाय शिवसेनेचे राजकारण पुढे सरकत नाही

शिवसेनेचे बडे नेते लवकरच 'भाजप'त येणार?

कुडाळ : शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर या सर्वांचे राजकारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका टिपणी केल्याशिवाय पुढे सरकत नाही, असा आरोप भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी येथे केला. यापुढे श्री. राणे व त्यांच्या कुटुंबावर टीका झाल्यास आम्ही सहन करणार नाही, असा इशारासुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. येथील लेमनग्रास हॉटेलमध्ये श्री. परब यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी श्री. परब म्हणाले, 'शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम असू द्या, शिवसेनेतील पालकमंत्री सामंत, खासदार राऊत, आमदार नाईक, दीपक केसरकर या सर्वांचा एक कलमी कार्यक्रम म्हणजे केंद्रीय मंत्री राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणे. त्याशिवाय यांचा दिवसही ढकलत नाही आणि राजकारणही पुढे सरकत नाही. आतापर्यंत या जिल्ह्यात याच राजकारणाच्या आधारावर आणि दहशतवादाचा मुद्दा घेऊन मतांची झोळी भरून घेतली; मात्र या सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी एक तरी विकासकाम आणले आहे का? तर नाही. सी वर्ल्ड, विमानतळ, मुंबई-गोवा महामार्ग, टाळंबा धरण हे सगळे प्रकल्प राणे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यात आले; पण या शिवसेनेच्या नेत्यांनी एकही प्रकल्प जिल्ह्यात आणला नाही.

हेही वाचा: 'राहुल गांधी ट्विट करतात अन् लगेच महाराष्ट्रात मोर्चा कसा निघतो?'

केवळ आपल्या राजकारणाची पोळी दहशतवाद या मुद्यावर भाजून घेतली. घावनळे येथे जो शिवसेनेमध्ये प्रवेश झाला, तो त्यांच्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील उपसरपंचाला फोडून शिवसेनेत घेतले गेले. काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आणि टीका भाजपवर, असे यांचे राजकारण आहे. पालकमंत्री ज्या पद्धतीत प्रवेशकर्त्यांसाठी आमिषे दाखवत आहेत, याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही त्या विरोधात आंदोलन करू. कारण पालकमंत्री शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना लिलाव पद्धतीने निधीची बोली लावत आहेत. यापुढे राणे व त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच भाजपवर नाहक टिका टिपणी केली तर गप्प बसणार नाही. त्याला योग्य ते उत्तर दिले जाईल.’’

यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, तालुका उपाध्यक्ष राजा धुरी, निलेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: कोकणकरांनी रात्रभर लुटला 'जाखडी नृत्य स्पर्धे'चा आनंद

बडे नेते भाजपमध्ये येणार

शिवसेनेमध्ये अनेकजण नाराज आहेत. त्यांची शिवसेनेत घुसमट झाली आहे. कोणत्याही प्रकारे त्यांना शिवसेनेने स्थान नाही, असे बडे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी योग्य वेळ आणि ठिकाण लवकरच निश्‍चित होऊन या शिवसेनेतील नेत्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे युवा नेते परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

loading image
go to top