दापोलीत शिवसेनेच्या 'या' युवा नेतृत्वाचा उदय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, बसप व २०१४ निवडणुकीत प्रभावी ठरलेले कुणबी पॅटर्न यावेळी प्रभावहीन झाल्याने त्यांच्याकडून मते खाण्याची अपेक्षा फोल ठरली.

मंडणगड - दापोली मतदारसंघात शिवसेनेच्या योगेश कदम यांच्या विजयाने युवा नेतृत्वाचा उदय झाला आहे. सेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून लौकिक असणाऱ्या या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. पाच वर्षांतच पुन्हा एकदा हा गड काबीज करून भगवा फडकवला.

राष्ट्रवादीला आपले मतदारसंघातील मताधिक्‍य वाढवूनही यशासाठी मांडलेली गणिते न सुटल्याने अपयश पहावे लागले. मात्र नोटाला या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मिळालेली मते राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारे आहे. गेल्या चार महिन्यांतील राजकीय परिस्थितीचे अवलोकन करता लोकसभा निवडणुकीत गुप्तपणे शिवसेनेला विरोध करणारे प्रचाराच्या अखेरच्या काही दिवसांत सेनेच्या उमेदवारविरोधात उघडपणे  प्रचाराची आघाडी उघडून बसले होते.

शिवसेनेची मते मुश्रीफांकडे वळविली काय?; समरजितसिंह यांचा सवाल 

असे असतानाही शिवसेनेने मिळवलेल्या विजयाचे सर्व श्रेय या मतदारसंघातील पारंपरिक शिवसैनिकांसह निवडणूक कालावधीत सक्रिय झालेल्या युवा कार्यकर्त्यांकडे जाते. निवडणूक कालावधीत विजयी उमेदवाराची मते फोडण्यासाठी प्रवाहित केलेले अंतर्प्रवाह पूर्णपणे निष्फळ ठरले.आघाड्या व अपक्ष उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवण्याइतकीही मते मिळवू शकले नाहीत. त्यामुळे मतदारांच्या बदललेल्या मानसिकतेचा समीक्षकांना फारसा अंदाज आला नसल्याचे चित्र निकालामुळे स्पष्ट झाले. आयत्या वेळी केलेली वातावरण निर्मिती मतदारांच्या मानसिकतेवर कोणताही फरक पाडत नसल्याचे अनुभवास आले.

...यामुळेच मी आता आमदारही; चंद्रकांत जाधव यांची प्रतिक्रिया 

कुणबी पॅटर्न यावेळी प्रभावहीन

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, बसप व २०१४ निवडणुकीत प्रभावी ठरलेले कुणबी पॅटर्न यावेळी प्रभावहीन झाल्याने त्यांच्याकडून मते खाण्याची अपेक्षा फोल ठरली. प्रचार कालावधीत शिवसेनेने गावभेटींसोबतच कॉर्नर व जाहीर सभा घेवून कार्यकर्त्यांचे मोठे मनुष्यबळ कामात आणले. त्यामुळे गेल्या विधानसभेची परतफेड करण्यात शिवसेना यशस्वी झाली.

विक्रमी विजयानंतर विश्वजित कदमांचा राहुल गांधींसोबत फोटो व्हायरल

उमेदवारांना मिळालेली मते

योगेश कदम ९५,३६४
संजय कदम ८१,७८६
प्रवीण मर्चंडे २,०१५
संतोष खोपकर १,३३६
सुवर्णा पाटील ८३२
नोटा २,७११

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Youth Leadership rise in Dapoli Yogehs Kadam wins