पर्यटकांना उन्हाळ्यात रायगड किल्ला नकोसा; व्यवसायावर परिणाम 

सुनील पाटकर
Monday, 6 May 2019

एप्रिल महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. तिव्र उन्हामुळे बाहेर पडणेही दुरापास्त झाले आहे. बेचाळीस अंशाहून अधिक तापमान या काळात होउ लागल्याने या वर्षी रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे.

महाड : राज्यात तापमानाचा पारा 42 अंशाच्यावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. यातच रायगड आणि परिसरातील गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. याचा मोठा परिणाम रायगडावरील पर्यटनावर झाला असून यावर्षीच्या उन्हाळी सुटीत रायगड किल्ल्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटन मंदावल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. 

यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. तिव्र उन्हामुळे बाहेर पडणेही दुरापास्त झाले आहे. बेचाळीस अंशाहून अधिक तापमान या काळात होउ लागल्याने या वर्षी रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे. राज्यातील विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या गावातही तापमानाचा त्रास, दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा सोसोव्या लागत असल्याने अनेक कुटुंब पर्यटनासाठी घराबाहेर पडली नाही. केवळ 20 टक्के पर्यटकच रायगडकडे येत असुन पर्यटकांनीही गडाकडे पाठ फिरवली आहे. रायगडावरील तीव्र उन्हाळा, रायगड फिरताना अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा पर्यटकांना नकोशा झाल्याचे दिसत आहे. शिवाय गडावर पर्यटन करतांना काही मर्यादाही येत असल्याने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. या हंगामात रायगड रोप-वेने दररोज 1 ते 2 हजार पर्यटकांची ये-जा होत असते. परंतु ही संख्या घटून 200 ते 500 च्या दरम्यान आली आहे. शाळांना सुटी पडली असून अनेकदा सलग सुट्याही आल्या होत्या. परंतु तरीही रायगडावर फारशी गर्दी दिसली नाही. यामुळे गडावरील गाईड, परिसरातील हॉटेल व्यवसायिक, लाँजिंग्स, दहीताक विक्रेते, टोप्या विक्रेते, रोपवे अशा सुमारे सत्तर व्यवसायिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. रायगडावर येणारे पर्यटक मुलाबाळांसह येत असल्याने ते राहण्यासाठी आगाऊ आरक्षण करत असतात. परंतू यावर्षी मे महिन्यात एकही आरक्षण झाले नसल्याचे पाचाड येथील हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले. तर यावर्षी पर्यटकांची संख्या मंदावली असून यामुळे व्यवसायही कमी झाला असल्याचे गणेश ढवळे या विक्रेताने सांगितले. रायगडावर पाण्याची सोय अपूरी आहे. तर पायथ्याशी असलेल्या रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी, रोप वे येथे मात्र पाणीटंचाई जाणवते त्यातच रायगडावर निवासाची सध्या कोणतीही सोय नाही. यामुळे अनेक जण पायथ्याशी राहणे पसंत करतात. पाणीटंचाईमुळे व्यवसायिकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे, याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. स्थानिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले असताना पर्यटकांची तहान तशी भागवायची हा प्रश्न आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sightseeing Business of Raigad Fort is less in Summer