esakal | कोकणात चार व्यावसायिकांना साडेतीन कोटींचा दंड; सिलिका प्लांटला ठोकले सील

बोलून बातमी शोधा

Silica plant fined Rs 3.5 crore crime marathi news kokan}


कासार्डे परिसरात महसूल विभागाची मोठी कारवाई; प्रकल्पाला ठोकले सील

कोकणात चार व्यावसायिकांना साडेतीन कोटींचा दंड; सिलिका प्लांटला ठोकले सील
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) :  कासार्डे परिसरातील सिलिका मायनिंग वॉशिंगचे अनधिकृत प्लांट चालवणाऱ्या चौघा व्यावसायिकांना आज तीन कोटी ३९ लाख ६८ हजार ५०४ रुपयांचा दंड आकारण्यात आला. पियाळी येथील एका अनधिकृत प्लांटला सील ठोकण्यात आले आहे. तहसीलदार रमेश पवार यांच्या पथकाने कारवाई केली असून, एवढी मोठी कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.

कासार्डे परिसरात चौघा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. सिलिका वॉशिंग केले जाते, तेथील वाळू आणि अनधिकृत साहित्याचा पंचनामा करण्यात आला. यात अनुक्रमे एक कोटी ४४ लाख ५० हजार ६५६, एक कोटी २० लाख १३ हजार ५८५, तसेच ४० लाख ९० हजार ४१६ आणि ३४ लाख १४ हजार ४४८ रुपये दंड आकारण्यात आला. पियाळीत त्या व्यावसायिकाने अनधिकृत प्लांट सोबत पाणी मोटर आणि पाण्याचा अवैध उपसा केल्याचे या पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले.

कणकवली तालुक्‍यात गेली काही वर्षे सिलिका मायनिंगचा अनधिकृत व्यवसाय राजरोस सुरू होता. यावरून गेले काही दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते. खणीकर्म विभागाने मध्यंतरी अवैध सिलिका वाहतूक करणारे डंपरही जप्त केले होते. कासार्डेसह पियाळी, फोंडाघाट, वाघेरी, लोरे या गावात सिलिका उत्खनन केले जाते. परिसरातच वॉशिंग प्लांट आहे. परिणामी हे पाणी नदीपात्रात मिसळल्याने काही गावातील नळपाणी योजनांचे पाणी दूषित झाले होते. याबाबच ग्रामपंचायतीने तक्रारी केल्या होत्या. उपोषणेही झाली; मात्र यातून हा व्यवसाय थांबला नाही. तहसीलदारांनी सिलिका व्यावसायिकांच्या अनेकदा बैठका घेऊन सूचना केल्या होत्या; मात्र गेले काही दिवस शासनाचा महसूल बुडीत काढत अनधिकृत व्यवसाय सुरूच होता.

हेही वाचा- ब्रेकिंग : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांचा राजीनामा

तक्रारी वाढल्यानंतरच कारवाई
तक्रारी वाढल्याने तहसीलदार यांनी नायब तहसीलदार राठोड यांचे एक पथक चौकशीसाठी नेमले होते. यात नांदगाव आणि जानवली तलाठी यांचाही समावेश होता. या पथकाने गेले काही दिवस या सिलिका व्यवसायाची पाहणी करून अहवाल तयार केला. त्यानंतर तहसीलार पवार आणि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस थेटपणे मोजणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

संपादन- अर्चना बनगे