नियम मोडताय? सावधान...! कारण आहेत `सिंधु पोलिस`

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

या ऍपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक एखाद्या बेकायदा कृत्याचे फोटो काढून तत्काळ जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षास कळवू शकणार आहेत.

सिंधुदुर्गनगरी -  लॉकडाऊनच्या काळात जमावबंदीचे उल्लंघन, अनधिकृत स्थलांतर, विध्वसंक वर्तन, संशयास्पद हलचाली किंवा इतर बेकायदा कृत्य तसेच अलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्यांची माहिती पोलिसांना तत्काळ देता यावी, यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाच्यावतीने "सिंधु पोलिस' (Sindhu Police) हे ऍप तयार करण्यात आले आहे. 

या ऍपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक एखाद्या बेकायदा कृत्याचे फोटो काढून तत्काळ जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षास कळवू शकणार आहेत. नागरिकांनी पाठविलेल्या फोटोसोबत अक्षांश व रेखांश यांची सुविधा उपलब्ध असल्याने पोलिस नियंत्रण कक्षास हे कृत्य कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडत आहे.

याबाबत अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 30 सेक्‍टर पेट्रोलिंग वाहनांपैकी जवळच्या वाहनास संपर्क साधून संबंधित ठिकाणी पोलिस पथक तत्काळ पाठवून बेकायदा कृत्यास आळा घालणे शक्‍य होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सिंधु पोलिस ऍप डाऊनलोड करून आपल्यासमोर घडत असलेल्या बेकायदा कृती तत्काळ जिल्हा पोलिस दलास कळवून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे. 

असे डॉऊनलोड करा ऍप 
Sindhu Police हे ऍप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून त्याची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.sindhu.police अशी आहे. हे ऍप सहज डाऊनलोड करता यावे यासाठी https://rebrand.iy/sindhupolice ही सोपी लिंक तयार करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhu police app created konkan sindhudurg