सिंधुदुर्ग : आंबोलीचा पाऊसही ‘लहरी’

जिल्ह्यात पावसाचा सध्या रेड अलर्ट असला तरी सरासरीमध्ये तो मागेच आहे.
Amboli
Amboli sakal

आंबोली : जिल्ह्यात पावसाचा सध्या रेड अलर्ट असला तरी सरासरीमध्ये तो मागेच आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारी आंबोलीही याला अपवाद नाही. सध्या या ठिकाणी ९३ इंच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमी आहे. एकूणच इतर भागाप्रमाणे आंबोलीचा पाऊसही गेल्या काही वर्षात लहरी झाल्याचे चित्र आहे.

राज्यात सर्वाधिक पाऊस हा सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगेतील आंबोलीमध्ये पडतो. देशात सर्वात जास्त पाऊस पूर्वेकडील चेरापुंजी तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक येथील आगुंबे येथे लागतो तर तिसऱ्या क्रमांकावर आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आंबोली येथे पाऊस लागतो. जगात सर्वाधिक पाऊस हिमालयातील मौसिंरम येथे लागत असला तरी २०१९ मध्ये आंबोलीत पडलेल्या पावसाने जागतिक विक्रम केला होता. तब्बल ४३५ इंचाची नोंद झाली होती. २०२० मध्ये ४२४ इंच तर २०२१ मध्ये ४३९ इंच पावसाची नोंद आंबोलीत झाली.

गेल्या वर्षी जूनमध्ये पाऊस कमी म्हणजे २९ इंच झाला होता. या वर्षी देखील येथे ७ जूनला काहीशा प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. मात्र, १३ तारीखला दमदार पाऊस सुरू झाला. यंदा जूनमध्ये ३८ इंच पाऊस झाला आहे. आता जुलैमध्ये पावसाने जोर धरला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे इंचाचे शतक पूर्ण होते आणि शेवटच्या आठवड्यात दुसरे शतक पूर्ण होते.

यंदा शनिवारी (ता.९) पर्य़त ९३ इंच पाऊस नोंदवला गेला. गेल्या वर्षी १२ जुलैला १०५ इंच आणि २६ जुलैला २०६ इंच पावसाची नोंद झाली होती. दरवर्षी जूनमध्ये कितीही पाऊस झाला तरी जुलै महिन्याच्या शेवटी २०० इंचपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असते. त्यामुळे जुलैत पाऊस आपले बॅकलॉग भरून काढणार, असा स्थानिकांचा अंदाज आहे. असे असले तरी आंबोलीत पावसाच्या बदललेल्या स्वभावाची जाणिव गेली पाच-सात वर्षे ठळकपणे जाणवत आहेत.

ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणातील बदल आदी याची कारणे आहेत. पावसाचा थेट परिणाम येथील वर्षा पर्यटनावर होत असतो. सध्या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी तुडुंब भरून रस्त्यावर आले आहे. मुसळधार पावसाचा थोडाफार परिणाम आंबोली पर्यटनावर होण्याची शक्यता असली तरी पुढच्या टप्प्यात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. इथला मुसळधार पाऊस आणि वारा पर्यटकांना भिजण्याचा मोह पाडतो. जोरात फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याखाली डुंबण्यासाठी धुक्यात आणि थंडगार वारा पाऊस अशात मस्तीत मौज करण्यासाठी तरुणाई आणि कुटुंबवत्सल पर्य़टकही आंबोलीकडे येताना दिसत आहेत. त्यामुळे पावसात आंबोली पर्यटन स्थळे आणि इथले रस्ते गाड्यांच्या गर्दीने आणि पर्यटकांनी फुलून जात आहेत. प्रशासन देखील याठिकाणी वाहतूक व्यवस्था केली आहे.

पावसाळ्यात तरुणाईसाठी पर्वणी

आंबोलीत पावसाळा म्हणजे एकदम हिमालयातील वातावरण असते. थंडगार पाऊस, धुक्याची उघडझाप, थंडी, वारा यामध्ये इथे पावसात मौज करण्यासाठी तरुणाईत क्रेझ आहे. कॉलेजच्या तरुणाईला देखील पावसात भिजून मजा मारण्यासाठी थ्रील वाटते. मोबाईलच्या आणि सोशल मीडियात हरवलेल्या तरुणाईला वेगळी पर्वणी पावसातच असते, असे व्यावसायिक गवंडे यांनी सांगितले.

आंबोलीतील पाऊस १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यत मोजला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाऊस सरासरीजवळ पोचला आहे; मात्र आकडेवारीत कमी आहे. २०१८ पर्यंत गेली २० ते २५ वर्षे पाऊस ३०० ते ३५० इंच इतका लागायचा. त्याआधी पाऊस ४०० ते ५०० इंचापर्यंत होता; मात्र, त्यावेळी पर्यावरण समृद्ध होते. सध्या बदललेल्या परिस्थितीत पावसाची अनियमितता ठळकपणे जाणवते.

- प्रल्हाद ऊर्फ भाऊ ओगले, पर्जन्यमापक, आंबोली

पावसाळ्यात आंबोलीचे आकर्षण आहे. इथला निसर्ग आणि वातावरण अन्य कोणत्याही ठिकाणी नाही. या काळात आंबोलीसह आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही हंगामी रोजगार व्यवसाय मिळतो. हुल्लडबाजी पर्यटकांना पायबंद घातल्यास आणखी फॅमिली पर्यटन वाढेल.

- प्रथमेश गवंडे, पर्यटन व्यावसायिक, आंबोली

आंबोलीत पावसाळ्यात धबधबे सुरू झाले की शनिवारी, रविवार आणि सुट्टी दिवशी हॉटेल्स फुल्ल असतात. त्यामुळे आंबोलीत पावसाळी हंगाम चांगला जातो.

- सुनील बांदेकर, हॉटेल व्यावसायिक, आंबोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com