रत्नागिरीतील भाजपचे नेतृत्व सिंधुदुर्गकडे ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चार शिवसेनेकडे आहेत तर एक राष्ट्रवादीने राखण्यात यश मिळवले. महायुतीच्या जागा वाटपात जिल्ह्यात एकही जागा भाजपला सोडण्यात आलेली नव्हती.

रत्नागिरी - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात मिळून एकमेव जागा सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या रुपाने भाजपला मिळाली आहे. एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार होते; मात्र आता एकही आमदार राहिलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ असून प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपकडून झालेल्या चुकांमुळे शिवसेना किती समजून घेईल, याबाबत साशंकताच व्यक्‍त केली जात आहे. दोन्ही जिल्ह्यात एकाच जागेवर भाजपचा आमदार आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्त्व सिंधुदुर्गकडे राहण्याची शक्यता वाढली आहे. 

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चार शिवसेनेकडे आहेत तर एक राष्ट्रवादीने राखण्यात यश मिळवले. महायुतीच्या जागा वाटपात जिल्ह्यात एकही जागा भाजपला सोडण्यात आलेली नव्हती.

उलट आघाडीमध्ये राजापूरची जागा काँग्रेसने लढवली. त्या ठिकाणी काँग्रेसच्या लाड यांना मिळालेली मते लक्षणीय असून भविष्यात त्याचा फायदा पक्षवाढीला होणार आहे. या उलट परिस्थिती भाजपची झालेली आहे. रत्नागिरीत एकही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यातच राज्यात भाजपच्या जागा घटल्या असून शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटणार हे निश्‍चितच आहेत. 

दापोली भाजपकडून शिवसेनेला झालेला विरोध, चिपळुणातील पराभवाच्या कारणातही साथ न मिळाल्याचा असलेला संशय, गुहागरमध्येही गटातटामुळे राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकरांना मिळालेले मताधिक्‍य या गोष्टी भविष्यातील भाजपच्या वाटचालीला अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. भाजपकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा नेतृत्वात बदल केल्यामुळे ती जबाबदारी जिल्हाध्यक्षावर पडणार आहे.

निवडणुकीप्रसंगी भाजपमधील बंडोबांना थंड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी यशस्वी प्रयत्न केले; मात्र आता पुढील वाटचाल करताना दापोली, गुहागर, चिपळूण आणि राजापुरात भाजप नेतृत्वाला शिवसेनेकडून कशा पद्धतीने वागणूक मिळणार हा संशोधनाचा मुद्दा झाला आहे.

सिंधुदुर्गकडे नेतृत्व?
रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आठ पैकी एकाच जागेवर भाजपचा आमदार आहे. नीतेश राणेंच्या रुपाने हे आव्हान जिवंत राहिले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचे नेतृत्व सिंधुदुर्गकडे राहण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. नीतेश यांनीही विजयानंतर दोन्ही जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg BJP Will lead in Ratnagiri