श्वानामुळे शेतकरी वाचला टस्कराच्या हल्ल्यातून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

अचानक टस्कर आला. त्याच्या ओरडण्याने घाबरून ते जीवाच्या आकांताने ओरडत पळाले. त्यांच्यासोबत असलेले श्‍वानही जोरजोरात भुंकू लागले.

साटेली भेडशी (ता. दोडामार्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्लेमध्ये काजू बागेत घुसलेल्या टस्कराने शेतकरी अनंत देसाई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची इमानी श्‍वान मोनूने मध्ये येत त्यांचा जीव वाचवला होता. दुसऱ्यांदा हल्ल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली. यापूर्वीही टस्कराने 9 जून 2019 ला त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. 

मोर्लेतील झरीकडे पैलाड नावाचा भाग आहे. तेथे गावकऱ्यांच्या काजूबागा आहेत. शिवाय काहींनी नव्याने काजू लागवड करण्यासाठी झाडझाडोरा साफ करून पूर्वतयारी सुरू केली आहे. श्री. देसाई यांची काजूबागही तेथे आहे. नेहमीप्रमाणे ते बागेत गेले होते. काजू गोळा करत असताना तेथील झाडामागून अचानक टस्कर आला. त्याच्या ओरडण्याने घाबरून ते जीवाच्या आकांताने ओरडत पळाले. त्यांच्यासोबत असलेले श्‍वानही जोरजोरात भुंकू लागले. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरीही सावध झाले. यामुळे श्री. देसाई बचावले. काहींनी हत्तीच्या वावराचे फोटो आणि व्हिडिओही काढले. श्री. देसाई यांच्यावर याआधीही हत्तीने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. 
गावकऱ्यांनी हत्तींच्या बंदोबस्ताबाबत वनविभाग ठोस पावले उचलत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 

वन क्षेत्रपाल दयानंद कोकरे यांच्याकडे वन कर्मचाऱ्यांसोबत फटाके पाठवा त्यांना नुसते पाठवू नका, अशी मागणी दूरध्वनीवरून केली. त्यावेळी त्यांनी फटाके देण्यास असमर्थता दर्शवून फोन तोडला, असे शिवसेनेचे कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये यांनी सांगितले. त्यानंतर मोर्ये यांनी उप वन संरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी फटाके देण्याची तयारी दाखवली असली तरी शुक्रवारपर्यंत वनविभागाकडून फटाके देण्यात आले नव्हते. 

टस्कराने मुक्काम हलविला

दरम्यान, त्या टस्कराने मोर्लेतील मुक्काम हलवला आहे. तो केर भेकुर्ली किंवा निडलवाडीकडे गेला असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg district The farmer survived the Tusker attack