काजूला योग्य दर मिळावा यासाठी जिल्हा बँक अध्यक्षांचा `हा` प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

लॉकडाऊनचा काळ असूनही जिल्हा बॅंकेने तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव दिला. यासाठी कृतज्ञता म्हणून माटणे आणि मोरगाव येथील विकास संस्थांनी बॅंकेचे अध्यक्ष सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी आणि संचालक प्रकाश गवस यांचा सत्कार केला.

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - सोसायट्यांच्या माध्यमातून काजू खरेदीसाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांना योग्य ते दर मिळण्यासाठी शक्‍यते प्रयत्न करू, असे आश्‍वासन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. 

लॉकडाऊनचा काळ असूनही जिल्हा बॅंकेने तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव दिला. यासाठी कृतज्ञता म्हणून माटणे आणि मोरगाव येथील विकास संस्थांनी बॅंकेचे अध्यक्ष सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी आणि संचालक प्रकाश गवस यांचा सत्कार केला. येथील शाखेत कार्यक्रम झाला. यावेळी शाखा व्यवस्थापक एम. एच. लाखे, विकास अधिकारी डी. एन. गावडे उपस्थित होते. 

श्री. सावंत म्हणाले, ""माटणे आणि मोरगाव सोसायटीसह शेतकरी बागायतदार काजू उत्पादक संघ आणि तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांच्या धाडसाचे कौतुक करतो. त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात बॅंकेवर विश्‍वास दाखवून काजू खरेदी केल्या. तालुक्‍यात जवळपास 150 टन तर जिल्ह्यात बाराशे ते तेराशे टन काजू आम्ही खरेदी करू शकलो. दोन वर्षापुर्वी श्री. दळवी यांनी बॅंकेच्यावतीने काटा लावून स्वतः काजू खरेदी केला त्यामुळे या चळवळीतील अग्रणी म्हणून त्यांचे आणि श्री. गवस यांचेही कौतुक करतो. जिल्ह्यात जवळपास 226 सहकारी संस्था आहेत. येत्या काळात त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू खरेदी करुन त्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल.'' 

प्रकाश गवस यांनी म्हणाले, ""जे काम कृषी उत्पन्न समितीने करायला हवे होते ते बॅंकेचे अध्यक्ष श्री. सावंत यांनी केले. त्यांनी शब्द दिला आणि पाळलाही. येत्या काळात सर्व विकास संस्थांनी काजू खरेदीचे नियोजन करायला हवे. शेवटच्या सभासदाला न्याय मिळेल, असे नियोजन संस्थांनी करायला हवे.'' संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, माटणेचे अध्यक्ष चंद्रकांत शिरोडकर, मोरगावचे अध्यक्ष गावकर, गणपत देसाई, संजय गवस उपस्थित होते. 

आंबा नुकसानभरपाई 22 कोटी 
जीआय मानांकनासाठीची रक्कम (खर्च) 3600 ऐवजी अठराशे रुपये केली आहे. शिवाय, एका सातबाऱ्यात कितीही नावे असली तरी जीआय मानांकनाचा फायदा सर्वाना होणार आहे, असे सांगून त्यांनी आंबा नुकसान भरपाईसाठी 22 कोटी रुपये मंजूर होणार असल्याची माहिती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg District President Satish Sawant Promise For Cashew Nut Rate