
सिंधुदुर्ग : हत्तींचा मोर्चा पुन्हा केरकडे
साटेली भेडशी : हत्तींच्या कळपाने पुन्हा आपला मोर्चा केरकडे वळवला. दोन दिवसांपूर्वी केरमधून मोर्लेत आलेला हतींचा कळप मंगळवारी (ता. १०) पुन्हा मोर्लेतून केरमध्ये पोहोचला. या त्यांच्या भ्रमंतीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.पाच हत्तींच्या त्या कळपात टस्कर, मादी तर तीन पिल्ले आहेत. प्रवासादरम्यान पहिल्यांदा टस्कर आणि तिघांमधील मोठ्या पिल्लाचे दर्शन झाले. त्यानंतर काही वेळाने मादी आणि दोन पिल्ले त्या दोघांना येऊन मिळाली. तिन्ही पिल्ले मध्ये आणि दोन्ही बाजूला हत्ती असे मनोहारी चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर त्यांनी केरच्या दिशेने कूच केली.
हत्तींचा आढळ वन्यप्रेमींसाठी सुखावह असला तरी काजुबागामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांची हत्तींच्या भीतीने भंबेरी उडते आहे. त्या दिवशीच्या केरच्या प्रवासादरम्यान हत्तींची गाठ पडल्याने काजू बागेत जाणारे नामदेव सावंत आणि त्यांची पत्नी भयभीत झाली होती. हत्तींनी त्यांना दुखापत केली नसली तरी दाम्पत्य घाबरल्याने त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वन्य हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी मोर्ले ग्रामस्थ संतोष व राजन मोर्ये यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.
हत्तीच्या कळपाला मानवी वस्ती व शेती बागायतीपासून दूर ठेवण्यासाठी मधमाश्यांच्या पेट्यांचा प्रयोग तिलारी खोऱ्यात केला जात आहे. त्या पेट्यांमुळे पाळीव प्राणी व अन्य वन्य प्राण्यांना उपद्रव होऊ शकतो. शासन त्याबाबत काय निर्णय घेणार आहे?
- प्रेमानंद देसाई, केर ग्रामस्थ
Web Title: Sindhudurg Elephant Procession Kerr
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..