सिंधुदुर्ग : मच्छीमारांना अखेर दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

process of awarding pond contract for fishing Fisheries

सिंधुदुर्ग : मच्छीमारांना अखेर दिलासा

देवगड: मच्छीमारांना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलचा दर आता खुल्या बाजारातील पेट्रोलपंपावरील डिझेलच्या दराप्रमाणे झाला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांसह मच्छीमारी संस्थाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. मच्छीमारी संस्थांनी कंपन्याकडे डिझेलची मागणी नोंदवली आहे.

मच्छीमारांना पुरवण्यात येणार्‍या डिझेल कोठ्याचा समावेश घाऊक खरेदीदार गटात करण्यात आल्याने वाढीव डिझेल दराचा फटका राज्याच्या पश्‍चिम किनारपट्टीबरोबरच गुजरातमधील मच्छीमारांना सहन करावा लागत होता. खुल्या बाजारातील पेट्रोलपंपावरील दरापेक्षा सुमारे २१ रूपये अधिक दराने मच्छीमारांना आपापल्या संस्थाकडून डिझेल खरेदी करावे लागत होते. त्यामुळे मच्छीमारांनी संस्थाकडून डिझेल खरेदी करणे बंद केल्याने अनेक मच्छीमार संस्थाही अडचणीत सापडल्या होत्या. साधारणतः १ मार्चपासून टप्याटप्याने मच्छीमारांना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलचा दर वाढत जावून त्यातील फरक २१ रूपयांपर्यंत पोचला होता. यापूर्वी मच्छीमारांना त्यांच्या संस्थाकडून पुरवण्यात येणार्‍या डिझेलचा दर खुल्या बाजारातील डिझेल दरापेक्षा काहीशा कमी दराने होत होता. त्याच्या परताव्याची रक्कमही मच्छीमारांना दिली जात असे; मात्र मध्यंतरी पेट्रोलपंपापेक्षा सुमारे २१ रूपये अधिक दर झाल्याने मच्छीमारांनी आपापल्या संस्थाकडून डिझेल खरेदी करणे बंद केले होते. त्यामुळे अनेक मच्छीमार संस्थाची डिझेल उलाढाल मंदावली होती. पर्यायाने संस्थांचा व्यवसायावर परिणाम जाणवला होता. याकडे राज्यासह केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा मच्छीमार संस्था प्रतिनिधींनी संबधितांच्या भेटी घेऊन चर्चा केली होती.

मच्छीमारांवर होत असलेल्या अन्यायाचे गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडण्यात आले होते. आता डिझेलचा दर खुल्या बाजारातील पेट्रोल पंपाप्रमाणे करण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांसह मच्छीमार संस्थांच्या दृष्टीने समाधानाची बाब मानली जात आहे. आता मच्छीमारांना पूर्वीप्रमाणे डिझेल परतावा रक्कमही मिळू शकते. त्यामुळे मच्छीमार संस्थांनी डिझेलची मागणी नोंदवली आहे. अजून मच्छीमारांचे अन्य काही प्रश्‍न सुटले नसले तरीही डिझेलचा प्रश्‍न तरी निकाली निघालाअसल्याचे चित्र आहे.

मच्छीमारांना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलचा समावेश घाऊक खरेदीदार गटात केला गेल्याने मच्छीमारांना सुमारे २१ रुपये अधिक दर पडत होता. याअनुषंगाने विविध संघटना प्रतिनिधींचे प्रयत्न सुरू होते. आता खुल्या बाजारातील पेट्रोल पंपावरील दरानुसार मच्छीमारांना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलचा दर झाला आहे. दरातील फरक नाहीसा झाल्यामुळे मच्छीमारांची संस्थांकडील डिझेल मागणी वाढली. ही दिलासादायक बाब आहे.

- अरुण तोरस्कर,व्यवस्थापक, तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था (देवगड)

Web Title: Sindhudurg Fish Rmen Finally Relieved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top