वन्यजीव तस्करीची या जिल्ह्यात पाळेमुळे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg has come forward to tighten the boundaries of wildlife trafficking marathi news

सिंधुदुर्गात जिल्ह्यात बिबट्या, खवले मांजर, मांडूळ, कासव, रानडुक्कर, घुबड या वन्यप्राण्यांची हौसेसाठी तसेच तस्करीच्या दृष्टीने आमिषाला बळी पडून अनेक स्थानिक लोकांच्या सहकार्यातून शिकार केली जाते.

वन्यजीव तस्करीची या जिल्ह्यात पाळेमुळे...

सावंतवाडी - सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीची पाळेमुळे घट्ट रुतल्याचे पुढे आले आहे. जागतिक स्तरावर गंभीर मानल्या जाणाऱ्या या तस्करीत स्थानिकांचा सहभाग उघड होऊ लागल्याने जिल्ह्यतील समृद्ध वन्यजीव संपत्ती धोक्‍यात आली आहे. सिंधुदुर्गात गेल्या सहा महिन्यांत कणकवली, वैभववाडीनंतर सावंतवाडीतील ही तिसरी घटना समोर आली आहे.

वन्यप्राणी संपत्ती धोक्‍यात; वन विभागाच्या मर्यादा उघड

जिल्ह्यात बिबट्या, खवले मांजर, मांडूळ, कासव, रानडुक्कर, घुबड या वन्यप्राण्यांची हौसेसाठी तसेच तस्करीच्या दृष्टीने आमिषाला बळी पडून अनेक स्थानिक लोकांच्या सहकार्यातून शिकार केली जाते. यामध्ये खवले मांजराची खवल्यांसाठी, तर वाघ, बिबट्याची नखे, कातडी आणि मांडूळ व इतर प्राण्यांच्या तस्करीतून लाखो रुपये कमावण्याच्या आमिषाने काही स्थानिक तस्करी करणाऱ्या रॅकेटला सहकार्य करत असल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यात खवले मांजर हा प्राणी अशा तस्करांची शिकार बनत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची लाखोच्या घरात किंमत आहे. शिवाय खवले मांजर पकडणे अत्यंत सोपे असल्याने त्याची जिल्ह्यातून तस्करी मोठ्या प्रमाणात होते. ही बाब वन विभागाला ज्ञात असूनही तो तस्करी रोखण्यात अपयशीच ठरला आहे.

पाहा - गोव्याच्या घरांना सिंधुदुर्गातील सोन्याची वाळू...

यासाठी केली जातेय शिकार

अलीकडच्या काळात खवले मांजर तस्करी करणाऱ्या टोळीतही वाढ होत चालली आहे. शारीरिक क्षमता वाढीसाठी लागणारे औषधे, उत्तेजक यात या प्राण्याच्या अवयवांचा वापर होतो. यामुळे त्याला मोठी मागणी आहे. विशेषतः चीनमध्ये याची चोरटी निर्यात होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला किंमत मिळत असल्याने याच्या तस्करीची पाळेमुळे खोलवर रूजली आहेत. बिबट्याच्या कातडी तस्करीचे प्रकारही यापूर्वी उघड झाले होते. जिल्ह्यातून गोवामार्गे तस्करीचे प्रकार जास्त संभवतात. सिंधुदुर्गच्या जवळच गोवा राज्य असल्याने या राज्यात येणारे आफ्रिकन, नायजेरियन व इतर तस्करी करणारे परदेशी नागरिक यांचे बहुतांशी संबंध हे त्यातील शिकारी व रॅकेटमध्ये कार्यरत असलेल्या लोकांशी असतात. स्थानिकांना सिंधुदुर्गातील वन्यजीवांची माहिती असल्याने त्यांचे संबंध जिल्ह्यातील तस्करी करणाऱ्यांशी जोडलेले असतात. असे प्रकार होत असताना वनविभाग मात्र हातावर हात धरून गप्प आहे. या प्राण्यांची तस्करी उघड झाल्यानंतर गुन्हे दाखल होतात; मात्र पुढे हे प्रकरण दडपण्यासाठीची लॉबीही सक्रीय होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वनविभागाने ठोस ॲक्‍शन प्लान आखणे गरजेचे आहे.

वाचा - त्या मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात

वन समित्यांची भूमिका महत्त्वाची

शासनाने त्या त्या भागाततील जैवविविधता आणि वन्यप्राणी संवर्धन या संदर्भात गावामध्ये वन समितीची स्थापना केली आहे; मात्र जिल्ह्यात या समित्या फारशा सक्रीय नसल्याचे चित्र आहे. वन समितीकडून वृक्षसंवर्धन जनजागृती, वृक्ष लागवड तसेच वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून जनतेशी संवाद या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही अभ्यासक व वन्य प्राण्यांविषयी तळमळ असलेले पर्यावरणप्रेमी वगळता, वन समितीतील काही सदस्य फक्त वनांच्या आर्थिक व्यवहाराव्यतिरिक्त अन्य कोणत्या गोष्टीत आवड असलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे गावातील वन समित्या या केवळ नावापुरत्याच आहेत. 

म्हादईमध्ये (गोवा) चार वाघांचा मृत्यू झाल्याचे लक्षात घेता वन्यप्राणी आणि मानव यात संघर्ष वाढत असल्याचे दिसते. वन्यप्राण्यांकडून मानवाच्या शेती पिकाचे किंवा पशुधनाचे नुकसान होत असताना अशा नागरिकांना भरपाई देण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. वन विभाग हा वन्यप्राणी आणि मानवातील एक दुवा आहे, ही भावना कमी होण्यास वन विभाग जबाबदार आहे.
- काका भिसे, पर्यावरणप्रेमी

वन्यप्राण्यांच्या तस्करीसंदर्भात वन विभागाने कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. कायदे व हक्कांच्या माध्यमातून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज तस्करी करणाऱ्यांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.
- प्रा. गणेश मर्गज

वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याचे नागरिकांना लक्षात आल्यास त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती देऊन सहकार्य करावे. तस्करी प्रकरणाविरोधात वन विभाग आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासंदर्भात प्रयत्नशील आहे. जैवविविधतेचे संगोपन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हे लक्षात घेऊन कोणीही आमिषाला बळी पडू नये.
- समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक, सावंतवाडी
 

टॅग्स :Sindhudurg