Sindhudurg : धोकादायक मार्गिकेची अखेर दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg

Sindhudurg : धोकादायक मार्गिकेची अखेर दखल

कणकवली : कासार्डे उड्डाणपुलालगत असलेल्‍या धोकादायक रस्त्याच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्‍यूनंतर पालघरप्रमाणेच कासार्डे तिठा येथील धोकादायक रस्ता चर्चेला आला होता.

पालघर येथे ४ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्‍यानंतर देशभरातील महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित झाले होते. यात कासार्डे उड्डाणपुलाच्या सुरवातीला चंद्रकोरीच्या आकारात कापलेला राष्‍ट्रीय महामार्गाचाही भाग चर्चेला आला. ज्येष्ठ पत्रकार व जनता दल मुंबईचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी फेसबुक आणि ट्विटरवरच्या माध्यमातून फोटोसह कासार्डे येथील महामार्गाची स्थिती मांडली होती. त्‍यानंतर फेसबुक, ट्वीटरवर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. राज्‍याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही या पोस्टची तातडीने दखल घ्यावी लागली.

श्री.चव्हाण यांनी कासार्डे उड्डाणपुलाच्या सुरवातीच्या भागात धोकादायक असलेल्‍या महामार्गावर सुरक्षिततेचे उपाययोजना करण्याचे निर्देश महामार्ग विभागाला दिले. त्‍यानंतर ठेकेदार कंपनीकडून या ठिकाणी बॅरल उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच येथे सिग्नल यंत्रणाही उभारली जात आहे. संपूर्ण महामार्गावरील अशा अपघात ठिकाणांची पाहणी करून सुरक्षेचे उपाय करावेत अशा सूचनाही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केल्या असल्‍याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जनसंपर्क अधिकारी चंद्रहास सावंत यांनी दिली.

ठेकेदाराकडून धोकादायक पर्याय

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली ते मुंबईच्या दिशेने जात असताना सेवा रस्ता आणि उड्डाणपुल यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्‍न सुटलेला नाही.

मोबदला न मिळाल्‍याने येथील जामीन मालकांनी सेवा रस्ता करण्यास नकार दिला होता. त्‍यामुळे ठेकेदाराने तेवढा भाग वगळला आणि महामार्गावरील तीन लेन पैकी एक लेन चंद्रकोरीच्या आकारात कापून सेवा रस्ता महामार्गाला जोडला होता. मात्र यात रात्रीच्या वेळेत पहिल्‍या लेनवरून जाणारे वाहन थेट दोन ते तीन फुट खोलगट भागातून सेवा रस्त्यावर कोसळून अपघात होण्याची शक्‍यता होती. हीच बाब सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर नारकर यांनी सोशल मीडियातून मांडली होती.

सामाजिक कार्यकर्ते जाधव यांचाही उपाययोजनांबाबत पाठपुरावा

जनता दल मुंबईचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी कासार्डे येथील धोकादायक रस्त्याबाबतची माहिती ९ सप्टेंबरला मांडल्‍यानंतर तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी तातडीने महामार्ग विभागाकडे धाव घेतली होती. तसेच महामार्ग विभागाचे शाखा अभियंता देवीदास कुमावत यांना घेऊन कासार्डेतील त्‍या धोकादायक भागाची पाहणीही केली होती. त्‍यानंतर सोमवार (ता.१२) पासून या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्‍याचे स्थानिकांतून सांगण्यात आले.

दोन ठिकाणी काम अपूर्ण

भूसंपादनाचा प्रश्‍न सुटत नसल्‍याने कासार्डे परिसरात आणखी दोन ठिकाणी महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. मोबदला न मिळाल्‍याने येथील काम स्थानिकांनी रोखले आहे. तर ठेकेदारानेही मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन लेन पैकी एका लेनचा भाग अर्धवट ठेवून महामार्ग पूर्णत्‍वास नेला आहे. वाहने ओव्हरटेक करताना या ठिकाणीही सातत्‍याने अपघातांची शक्‍यता निर्माण होत आहे.