esakal | नजर जाईल तिथपर्यंत मृत्यूचा खच ; खांदा द्यायलाही नव्हती माणसे 

बोलून बातमी शोधा

sindhudurg malaria memories corona virus

कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण जगासह आपला सिंधुदुर्गही अनिश्‍चीततेच्या आणि भितीच्या छायेखाली वावरत आहे. पण असे संकट सिंधुदुर्गासाठी नवे नाही. शंभर वर्षापूर्वी मलेरियाचा याहून अधिक गंभीर कहर तत्कालीन सावंतवाडी संस्थानसह जिल्ह्यावर कोसळला होता. पण या संकटावरही सिंधुदुर्गाने, तत्कालीन राज्यकर्त्यांनी मात केली होती. ही संघर्षगाथा सकाळच्या वाचकांसाठी दोन भागात मांडत आहोत. कोरोनाविरूध्दच्या लढाईत जिल्हावासियांचे आणि त्याबरोबरच या विरोधात खर्‍या अर्थाने लढणार्‍या प्रशासनाचे यातून नक्कीच मनोधैर्य वाढेल.

नजर जाईल तिथपर्यंत मृत्यूचा खच ; खांदा द्यायलाही नव्हती माणसे 
sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी -  शंभर वर्षापूर्वीचा तो काळ. तत्कालीन सावंतवाडी संस्थानच्या कार्यक्षेत्रातील माणगाव खोर्‍यापासून थेट राजधानी असलेल्या सुंदरवाडीपर्यंत मृत्यूचे थैमान सुरू होते. खांदा द्यायला माणसे अपुरी पडत होती. यामुळे मृत्यूची चाहूल लागलेले आपलीच तिरडी बांधून ठेवायचे. हा कहर मलेरीयाच्या साथीमुळे या भागावर कोसळला होता.

त्या काळात शेतीभाती अपुरी पडायची. त्यामुळे अनेकजण मजुरीच्या शोधात असायचे. धारवाड (कर्नाटक) येथे ब्रिटीशांनी साधारण 1920 च्या दशकात रेल्वे मार्गाचे काम सुरू केले. माणगाव खोर्‍यातून अनेकजण तेथे मजुरीसाठी गेले होते. तेथून परतताना ते मलेरियाची भेट माणगाव खोर्‍यात घेवून आले. 
ही साथ प्रचंड वेगाने वाढू लागली. आकेरी-माणगावपासून थेट दुकानवाड, वसोलीपर्यंत याचा प्रभाव पोहोचला. हळहळू ती कुणकेरी, कोलगाव या सावंतवाडीच्या हद्दीवरून शहरापर्यंत पोहोचली. माणसे पटापट मरू लागली. या तापाचे निदान होईना. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष (कै.) शिवरामभाऊ जाधव यांनी याआधी सांगितलेली आठवण या भपरिस्थितचे गांभीर्य स्पष्ट करायला पुरेशी आहे. त्याकाळात खांदा द्यायला माणसे अपुरी पडायची. यामुळे मृत्यूची चाहूल लागलेले आपली तिरडी आधीच बांधून ठेवायचे. रांगणा तुळसुली या छोट्याशा गावात एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यु झाल्याचा प्रसंगही त्यांनी आपल्या कटू आठवणींमध्ये सांगितला होता. ही स्थिती आताच्या इटली इतकीच भयानक म्हणावी लागेल.

हे पण वाचा - अहो नवलच! कोरोनामुळे यांनी उरकला ऑनलाइन साखरपुडा

या तापामुळे माणगाव खोर्‍यातील अनेक गावे ओस पडली आहे. माणगाव खोर्‍यात असलेल्या दोन हजार वस्तीपैकी अवघी पाचशे माणसे उरली. यामुळे वन्य प्राणी वस्तीत मुक्त संचार करू लागले. अनेक घरे निर्वंश झाली. तापाचे निदान आणि उपचार होत नसल्याने हा देवाचा कोप आहे. असा समज पसरला. यातून माणगाव खोर्‍यांतील अनेकांनी आपली राहती घरे सोडून स्थलांतर केले. गावे निर्मनुष्य झाली. 

हे पण वाचा - रत्नागिरीत स्वंयचलित सॅनिटायझर डोम ; असे होते निर्जंतुकीकरण

संस्थानची राजधानी असलेल्या सावंतवाडीतवरही याचा परिणाम झाला. लोकसंख्या कमालीची घटली. त्याकाळातही शहराजच्या लोकसंख्या आकडेवारीवरून या संकटाची तीव्रता लक्षात येते. पुढे या विरोधात संस्थानने सक्षम लढा दिला. पुढच्या भागात याची माहिती देणार आहोत पण याचा प्रभाव दिर्घकाळ दिसल्यामुळे दहा वर्षात अवघ्या हजार दीड हजार इतक्या लोकसंख्या वाढीचे चित्र पुढच्या 30 वर्षात दिसले.