अहो नवलच! कोरोनामुळे यांनी उरकला ऑनलाइन साखरपुडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

जमावबंदीमुळे गर्दी करण्यावरही निर्बंध आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी सरकारच्या सूचनांचे सक्तीने पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच हा साखरपुडा ऑनलाइन करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी सामाजिक अंतरही ठेवण्यात आले.

हुक्केरी (बेळगाव) : विवाह आणि  त्याच्याशी संबंधित विविध विधींना भारतीय परंपरेनुसार  महत्त्व आहे. पण कोरोनाच्या थैमानामुळे या सगळ्याला फाटा देण्याची वेळ आली आहे. हुक्केरी तालुक्यातील अतिहाळ सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश उर्फ पी. डी. पाटील यांची (रा. संकेश्वर) कन्या अनुष्का आणि बागलकोट येथील सुरेश मलकाजप्पा अरकेरी यांचे पुत्र महांतेश यांचा साखरपुडा चक्क ऑनलाइन करण्यात आला. 

सोमवारी (ता.६) संकेश्वरमधील पाटील फार्महाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमास मोजकीच मंडळी उपस्थित होती. 

कोरोनामुळे लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे. जमावबंदीमुळे गर्दी करण्यावरही निर्बंध आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी सरकारच्या सूचनांचे सक्तीने पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच हा साखरपुडा ऑनलाइन करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी सामाजिक अंतरही ठेवण्यात आले. अंगठी अथवा पुष्पहार परिधान न करता वाद्यांच्या निनादाविना अनुष्काचा विवाह महांतेश अरकेरी यांच्यासमवेत ऑनलाईन केला. 

याबात बोलताना वधूचे वडील प्रकाश पाटील म्हणाले, 'कोरोनाचा कहर जोरात सुरू आहे. त्यामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे वधू व वराकडील मंडळी तसेच नातेवाईकांनी एकत्र येणे कठीण होते. म्हणूनच कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा कार्यक्रम व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ऑनलाईन पूर्ण करण्यात आला.

हे पण वाचा - परवाना असूनही चंदगड पोलिसांची अशी क्रुरता

कार्यक्रमाला उपस्थित हुक्केरी तालुका अक्षर दासोहचे सहाय्यक संचालक श्रीशैल हिरेमठ म्हणाले की, 'कोरोनाच्या निर्मूलनासाठी प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. संकेश्वरच्या पाटील कुटुंबीयांनी ऑनलाईन साखरपुडा करून आपली जबाबदारी पार पाडली आहे. यावेळी जयश्री पाटील, लीला पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

'सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. त्यातून मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तसेच ऑनलाइनवर भर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण साखरपुडा केला आहे.' 

-अनुष्का पाटील, नववधू

हे पण वाचा - ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडला कोरोनाचा आणखी एक रूग्ण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online engagement belgaum