esakal | Sindhudurg : मेडिकल कॉलेजला यंदा पहिली बॅच असणारच : राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg : मेडिकल कॉलेजला यंदा पहिली बॅच असणारच : राऊत

Sindhudurg : मेडिकल कॉलेजला यंदा पहिली बॅच असणारच : राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस : कितीही काळी मांजरं आडवी आली तरी १०० टक्के मेरिटने शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळवत या वर्षी पहिली १०० मुलांची बॅच प्रवेश घेणारच. केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पूर्ण करीत पुन्हा प्रस्ताव ३० तारखेला सादर करण्यात आला आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी आज ओरोस फाटा येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल महाविद्यालयापेक्षा सातारा, अलिबाग शासकीय महाविद्यालयात त्रुटी होत्या. तरीही त्यांना मान्यता मिळाली. केवळ सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये त्रुटी काढत मंजुरी दिलेली असताना त्रुटी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. हे केंद्रीय समितीला उशिरा का सुचले? यामागे कोणाचा स्वार्थ आडवा येत आहे? कोणाच्या उपक्रमावर बंधने येणार आहेत? त्यामुळे हा जावई शोध लावला गेला.’’

राऊत म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय मेडिकल कमिशनने १७ सप्टेंबरला मान्यता दिली. त्यांनीच २१ सप्टेंबरला त्रुटी सांगत ती पूर्ण करण्याची मुदत दिली. त्रुटी पूर्ण करण्यास सांगितले आहे; परंतु मान्यता रद्द केलेली नाही. ही कमिटी जिल्ह्यातून परत जावी, यासाठी काहींनी प्रयत्न केले होते. त्यांना येथे शासकीय महाविद्यालय होऊच नये, असे वाटत आहे; मात्र आम्ही शांत बसलेलो नाही. कारण यात आमचा किंवा पक्षाचा स्वार्थ नाही. स्वार्थ आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा.’’

ते म्हणाले, ‘‘परीक्षा हॉल नाही, स्टाफ क्वॉटर्स सुविधा नाहीत, फर्निचर नाही, अशा त्रुटी काढण्यात आल्या होत्या. त्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली होती; मात्र आम्ही त्याची आधीच पूर्तता केली आहे. तसा प्रस्ताव पुन्हा पाठविला आहे. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा समिती कधी येते याबाबत उत्सुकता आहे. पावणे दोन कोटींचे फर्निचर उभारले आहे. एमबीबीएससाठी पुस्तके उपलब्ध केली आहेत. परीक्षा हॉल स्वतंत्र आहे. आता मेडिकल कॉलेजला पूर्णवेळ डीन मिळाले आहेत.’’

आमदार नाईक म्हणाले, ‘‘शासनाने जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज देणे बंद केले आहे. सिंधुदुर्गात यासाठी अन्य पोषक जागा मिळत नसल्याने जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेजला परवानगी मिळावी, यासाठी आम्ही आग्रही राहिलो. त्यावेळी राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज मंजूर करताना हे शेवटचे जिल्हा रुग्णालयातील मेडिकल कॉलेज असेल, असे जाहीर केले. यासाठी २५ एकर जागेची गरज असताना केवळ २० एकर जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी आग्रही राहिल्याने येथे मेडिकल कॉलेज मंजूर झाले.’’ या वेळी आमदार वैभव नाईक, महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते.

loading image
go to top