सिंधुदुर्गात आढळले तब्बल ११२ बिबटे

अमोल टेंबकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सावंतवाडी - जिल्ह्याच्या वन विभागाकडून नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल ११२ बिबटे आढळून आले आहेत. आंबोली वनक्षेत्रात ४२ बिबट्यांसह ३४ अस्वलांचे अस्तित्व आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे.

सावंतवाडी - जिल्ह्याच्या वन विभागाकडून नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल ११२ बिबटे आढळून आले आहेत. आंबोली वनक्षेत्रात ४२ बिबट्यांसह ३४ अस्वलांचे अस्तित्व आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे.

फेब्रुवारीअखेरीस कॅमेरे तसेच विष्ठा, ओरखाडे आणि अन्य खुणा ओळखून ही गणना झाली. यात एकूण विविध प्राण्यांची संख्या १०७५ एवढी आहे. याबाबतची माहिती उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. दर पाच वर्षांची वन्यप्राण्याची गणना करण्यात येते. यात बिबट्यांची संख्या वाढली असून, मोरांची संख्या कमी झाली आहे.

सावंतवाडी तालुक्‍यात एकही मोर नसल्याचा दावा, या अहवालात केला आहे. अन्य प्राण्यांचाही त्यात समावेश आहे, असे सांगण्यात आले. गणना झालेल्या क्षेत्रात जिल्ह्यातील पाच वनक्षेत्रांचा समावेश आहे. यात आंबोली, सावंतवाडी, दोडामार्ग, कडावल, कुडाळ, कणकवली आदींचा समावेश आहे. यात बिबट्यांची संख्या आंबोलीत ४२ इतकी जास्त आहे, तर कणकवलीत एकही बिबटा नाही.

सावंतवाडीत १०, कडावलमध्ये २४, कुडाळ रेंजमध्ये ३० आणि दोडामार्गमध्ये सहा इतकी संख्या आहे. गव्यांची संख्या १८१ इतकी आहे. यात सर्वात जास्त गवे आंबोलीत आहेत. सांबार ११७ आहेत. त्यात आंबोलीत ४० तर सावंतवाडी  ४३ इतकी संख्या आहे. सर्वात कमी कुडाळ भागात आहेत.

हरीणांची संख्या आंबोलीत अकरा इतकी आहे. जिल्ह्यात साळींदर ४१, शेकरू ५५, डुक्कर ४३, माकड ३१७, वानर ३१९ इतके आहेत. आंबोली वनविभागाच्या हद्दीत एकूण ३९३ प्राणी, सावंतवाडी हद्दीत ४५७, दोडामार्ग हद्दीत १२५, कडावलमध्ये ६२, कुडाळ हद्दीत ८३ तर कणकवली हद्दीत ३५४ वन्यप्राणी आहेत, असे त्यांनी सांगितले.

हा अहवाल कॅमेरा किंवा खुणा आढळून आलेल्या परिसरातून अडीच किलोमीटर परिसरातून घेण्यात आला आहे. यात पाणवठ्यावर लावलेल्या कॅमेऱ्यात अनेक प्राणी दिसून आले आहेत. यातून काही प्राणी चुकल्याची शक्‍यताही नाकारता येत नाही, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

जंगलात खाद्य मिळत नसल्याने अनेक वन्यप्राणी आता वनाच्या बाहेर येत आहेत. त्यामुळे अनेक लोकांनी आता शेती सोडली आहे. परिणामी त्याचा फायदा वन्यजीवांची संख्या वाढण्यात झाला आहे. त्यात बिबट्यांचा अन्य वन्यप्राण्यांचा समावेश आहे. ही बाब प्राणीप्रेमींना समाधानकारक आहे.
- सुभाष पुराणिक,
सहायक उपवनसंरक्षक

पट्टेरी वाघ आहेत; पण
या वन्यप्राणी गणनेत पट्टेरी वाघ आणि हत्तीचे अस्तित्व आढळून आले आहे; मात्र त्या प्राण्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही माहिती अधिकाऱ्यांनी देण्यास नकार दिला आहे. याबाबतची गोपनीय माहिती देता येऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News 112 leopard seen district