राज्यात खारफुटी जंगलाचा ८२ चौरस किलोमीटर इतका विस्तार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

राज्यातील खारफुटी जंगल ८२ चौरस कि.मी. ने वाढल्याचे देशाच्या वार्षिक वन अहवालातून स्पष्ट झाले आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामानबदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वने विभागाचा वर्ष- २०१७ अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या एकूण वनाच्छादित क्षेत्र ८ हजार २१ चौरस किलोमीटरची वाढ झाली असून जगात भारताचा दहावा क्रमांक लागतो.​

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गातील खारफुटीच्या जंगलात वाढ झाली आहे. जिल्ह्यात जवळपास ५ चौरस किलोमीटर इतके खारफुटी जंगल विस्तारले आहे. केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. किनारपट्टीवरील पर्यावरणाच्यादृष्टीने ही वाढ सुखद मानली जाते.

जिल्ह्यात आचरा, आरोंदा आदी भागात खारफुटीचे जंगल आहे. मधल्या काळात या खारफुटीची मोठ्या प्रमाणात तोड सुरु होती. यामुळे किनारपट्टीची धूप होण्याबरोबरच सागरी पर्यावरणावर भीतीची छाया होती. खारफुटीची मुळे ही माशांच्या प्रजननाची केंद्र मानली जातात; मात्र या झाडांच्या तोडीमुळे मत्स्य प्रजननही अडचणीत येण्याची भीती होती. अलिकडच्या काळात खारफुटी तोडीला प्रतिबंधाबाबत जागृती होऊ लागली आहे. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील खारफुटीचे जंगल वाढल्याचे पुढे आले आहे.

महाराष्ट्राचा वाटा ८२ चौरस किलोमीटर

देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौरस किलोमीटर एवढी वाढ झाली असून यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा ८२ चौरस किलोमीटर एवढा आहे. राज्यातील ठाणे (३१), रायगड (२९), मुंबई उपनगर (१६), सिंधुदुर्ग (५),रत्नागिरी (१) आणि मुंबई शहर (०) या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

राज्यातील खारफुटी जंगल ८२ चौरस कि.मी. इतके आहे. देशाच्या वार्षिक वन अहवालातून स्पष्ट झाले आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामानबदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वने विभागाचा वर्ष- २०१७ अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या एकूण वनाच्छादित क्षेत्र ८ हजार २१ चौरस किलोमीटरची वाढ झाली असून जगात भारताचा दहावा क्रमांक लागतो. या अहवालानुसार जंगलातील पानथळ क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्र ४३२ चौरस किलोमीटर आहे. ४२८ चौरस किलोमीटर सह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादित ३८९ चौरस किलोमीटर सह मध्यप्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अशी असतात खारफुटीची जंगले...
खारफुटी अर्थात तिवराच्या वनांना आपल्याकडे काही भागात ‘कांदळवने’ असेही म्हणतात. यांना ‘मंगलवने’ असेही संबोधले जाते. समुद्राची ताकद स्वतःच्या अंगावर झेलून किनारपट्टीला संरक्षण देण्याचे काम ही झाडे करतात. समुद्र आणि जमीन यांच्यामध्ये असलेली नैसर्गिक भिंत (बॅरियर) अशीही त्याची ओळख आहे. ही झाडे जैवविविधतेचे समृद्ध दर्शन घडविणारी असतात. ती समुद्र पातळीपासून भरतीच्या क्षेत्रात (नद्यांच्या त्रिभूज प्रदेशात), खाड्यांच्या किनारी आढळतात. ती झाडे खाऱ्या पाण्यात वाढतात. श्‍वसनासाठी ओढलेल्या क्षारयुक्त पाण्यातील मीठ ती आपल्या पानांच्या मागच्या बाजूला असलेल्या शिरांमधून बाहेर फेकतात. म्हणूनच यांना खारफुटी (मॅन्ग्रोव्ह) असे म्हणतात. कोकणात जैतापूर, मालवण, आचरा, वेंगुर्ले, मुंबईतील काही खाड्या या ठिकाणी तिवराची जंगले आहेत. जिल्ह्यात विशेषतः हुरा किंवा फुंगी, कांदळ, चिप्पी, छुटी चिप्पी किंवा सोन चिप्पी, मेसवाक असे खारफुटीचे प्रकार आहेत.

अहवालानुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलीक क्षेत्र ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर आहे. यापैकी ५० हजार ६८२ चौरस किलोमीटर क्षेत्र वनव्याप्त असून ते भौगालीक क्षेत्राच्या १६.४७ टक्के आहे. यात ८ हजार ७३६ चौरस किलोमीटर हे अती घनदाट जंगल, २० हजार ६८२ मध्यम घनदाट जंगल, २१ हजार २९४ चौरस किलोमीटर विरळ जंगल तर ४ हजार १६० चौरस किलोमीटर खुरटे जंगल आहे. राज्यात एकूण ७ डोंगराळ जिल्हे असून त्यांचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६९ हजार ९०५ एवढे आहे. यापैकी १५ हजार ६२० हे वनक्षेत्र असून ते २२.३४ टक्के आहे. एकूण वनक्षेत्रात अती घनदाट जंगल ३१५ , मध्यम घनदाट जंगल ७ हजार २४५, विरळ जंगल ८ हजार ५९ आणि खुरटे जंगल १ हजार ४१५ चौरस किलोमीटर आहे.

मत्स्य क्षेत्रास दिलासा...
बहुसंख्य मासे अंडी घालण्यासाठी या खारफुटीच्या क्षेत्रात येतात. खारफुटीच्या मुळाशी हे मासे अंडी घालतात. खेकडे, कासव, शिंपले यांचे वास्तव्यही या काळात या क्षेत्रात असते. त्यांना अन्न आणि लपण्याची चांगली जागा तेथे मिळते; मात्र ही जंगले नष्ट होत असल्याने मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होत आहे; मात्र आता खारफुटी क्षेत्र वाढत असल्याचे समोर आल्याने या क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खारफुटी संवंर्धनासाठी जेष्ठ पर्यावरणवादी अरविंद उंटवाला यांनी प्रयत्न केले होते. वन विभागाकडून फारसे सक्रिय प्रयत्न झाल्याचे चित्र नाही. तरीही या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसत आहेत.

Web Title: Sindhudurg News 82 Square KM Kharland forest in state