आंबोलीच्या बदनामीचा पर्यटनाला फटका

अनिल चव्हाण
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

आंबोली - आंबोलीच्या घाटात तसेच दऱ्याखोऱ्यांत उघड होणाऱ्या गैरकृत्यांमुळे जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशनची फुकटची बदनामी होत आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यटनावरही होत आहे. त्यामुळे ही बदनामी त्वरित थांबविणे गरजेचे आहे.

आंबोली - आंबोलीच्या घाटात तसेच दऱ्याखोऱ्यांत उघड होणाऱ्या गैरकृत्यांमुळे जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशनची फुकटची बदनामी होत आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यटनावरही होत आहे. त्यामुळे ही बदनामी त्वरित थांबविणे गरजेचे आहे.

आंबोली येथे पर्यटनाची बीजे ब्रििटशकाळापासून रुजवली गेली. गेल्या पंधरा-वीस वर्षांत खऱ्या अर्थाने याला व्यावसायिक रूप आले. सुरवातीला आंबोलीचे पर्यटक चढत्या क्रमाने वाढणारे होते. एकमेव हिलस्टेशन असल्याने प्रतिमहाबळेश्‍वर अशी ओळख निर्माण होत होती. अलीकडे मात्र येथील पर्यटनाच्या वाढीला मर्यादा येऊ लागल्या आहेत. पर्यटन दीर्घकाळ थांबावेत असे प्रकल्प नसण्याबरोबरच अशा घातपाताच्या प्रकारांमुळे होणारी बदनामी हेही यामागचे कारण आहे.

आंबोलीत कुटुंबवत्सल पर्यटक येतात. येथील निसर्ग त्यांना साद घालतो. अशा पर्यटकांना सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असतो; मात्र अशा प्रकारांमुळे काहीशी भीती निर्माण होत आहे. वास्तविक घातपाताच्या या घटनांमध्ये आंबोली किंवा इथल्या रहिवाशांचा काडीचाही संबंध नाही. आंबोलीची संस्कृती इथल्या वातावरणाप्रमाणेच शांत आणि सुसंस्कृत आहे. या गावाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे; मात्र गेल्या काही वर्षांत घडलेल्या गैरकृत्यांमुळे आंबोलीची ही खरी ओळख कुठेतरी झाकोळली जाते की काय, असे वातावरण निर्माण होत आहे. हे सगळे थांबविण्यासाठी येथे होणारी गैरकृत्ये थांबणे गरजेचे आहे. येथील सुरक्षितता पर्यटकांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजे.

येथे पर्यटनावर कित्येक कुटुंबे अवलंबून आहेत. स्थानिकांनी कोट्यवधीची या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली आहे. भविष्यातील वाढीव पर्यटन गृहीत धरून ही गुंतवणूक झाली. पर्यटन न वाढल्यास हे व्यावसायिक अडचणीत येणार आहेत. अजूनही स्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. येथे पर्यटन वाढीबरोबरच सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्यादृष्टीने शासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Crime in Amboli region special story