कणकवली तालुका परिसरात बिबट्याची दहशत 

उत्तम सावंत
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नांदगाव - कणकवली तालुक्यात असलदे दिवानसानेवाडीत गेले आठवडाभर बिबट्याने दहशत माजवली आहे. अनंत परब व सुरेश सुतार यांच्या तीन वासरांचा फडशा पाडला आहे. या भागात दिवसा ढवळ्या बिबट्या मुक्त संचार करत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

नांदगाव - कणकवली तालुक्यात असलदे दिवानसानेवाडीत गेले आठवडाभर बिबट्याने दहशत माजवली आहे. अनंत परब व सुरेश सुतार यांच्या तीन वासरांचा फडशा पाडला आहे. या भागात दिवसा ढवळ्या बिबट्या मुक्त संचार करत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पाऊले उचलावित अशी मागणी होत आहे.

असलदे दिवानसानेवाडी येथे बिबट्याचा वावर वाढला असून थेट लोकवस्तीपर्यंत या बिबट्याचा मुक्त संचार आहे. बिबट्याच्या हल्यात अनंत परब यांची दोन तर सुरेश सुतार यांचे एक वासरू ठार झाले. दिवानसानेवाडी येथील सोनाराचा खंड व सड्याजवळ या बिबट्याचा सध्या मुक्काम असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भितीपोटी महिलावर्ग सरपण आणण्यासाठी बाहेर पडण्यासही घाबरत आहेत. एवढी दहशत या बिबट्याने माजवली आहे.

वनविभाग याबाबत माहिती मिळाल्यावर पंचनामे करतात मात्र पकडण्यासाठी किंवा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने कोणताही प्रयत्न करत नाहीत. याबाबत लोकांमधून नाराजीचे सुर उमटत आहेत. वनविभागाचे साटम, पशुवैद्यकिय अधिकारी खांबल यांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. या वेळी सरपंच पंढरी वायंगणकर, सत्यवान मेस्त्री, मधूकर मिठबावकर, सुभाष परब, सुरेश सुतार, शामू परब, अनंत परब, संतोष शेलार, अनिल परब, संतोष घाडी, विनायक जांभळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Sindhudurg News leopard seen in Kankavali Taluka