संदेश पारकरच भाजपचे उमेदवार - रवींद्र चव्हाण

संदेश पारकरच भाजपचे उमेदवार - रवींद्र चव्हाण

कणकवली - ‘‘येथील नगरपंचायतीची निवडणूक संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी यावर अंतिम शिक्‍कामोर्तब झाले. तेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर उर्वरित १७ प्रभागातील उमेदवार नंतर जाहीर होतील. युतीबाबत शिवसेनेचा प्रस्ताव आला आहे. तर गाव आघाडीसोबत देखील चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

भाजपवासी झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना नगरपंचायत निवडणुकीत सहभागी करून घेणार का? या प्रश्‍नाला श्री. चव्हाण यांनी बगल दिली. भाजपच्या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन कुणीही भाजप पक्षाचा सदस्यत्व होऊ शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला. स्वाभिमान पक्षाशी युती करण्याबाबत कसलीही चर्चा झालेली नाही. आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार मान्य असेल तर आम्ही कुठल्याही पक्षासोबत चर्चा करायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

येथील हॉटेल जलतरंगमध्ये भाजप उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. या दरम्यान राज्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेबाबतची माहिती दिली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, संदेश सावंत पटेल आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘येथील नगरपंचायत निवडणूक अटीतटीची होणार आहे. यात संदेश पारकर हेच भाजपला यशाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतील, असा विश्‍वास भाजपच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केला. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होण्याबाबत त्यांना विनंती करण्यात आली. पारकर यांनीही शहराचे नेतृत्व करण्याचे मान्य केले आहे. याखेरीज उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनीही हा निर्णय खुल्या दिलाने स्वीकारला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. उर्वरित १७ प्रभागांत कोण उमेदवार असतील, याबाबतचा निर्णय सोमवार (ता. १९) पर्यंत जाहीर करणार आहोत. युती करून निवडणूक लढविण्याबाबत शिवसेनेकडून पर्याय आला आहे. त्याबाबत आमची आजपासून बोलणी सुरू होणार आहेत. भाजपने कधीच स्वबळाची घोषणा केलेली नाही. सर्वांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. फक्‍त शिवसेना हाच पक्ष वारंवार स्वबळाचा नारा देत आहे. नगरपंचायत निवडणुकीत गाव आघाडीबरोबर देखील युती करण्याबाबत आम्ही बोलणी करणार आहोत.’’

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासोबत युती-आघाडी करण्याबाबत चर्चा झाली का? या पक्षाचे मोठे आव्हान असेल का? या प्रश्‍नाला श्री. चव्हाण यांनी बगल दिली. तसेच स्वाभिमानचे संस्थापक नारायण राणे हे आता भाजप पक्षात आले आहेत. त्यांना या निवडणूक प्रक्रियेत सामील करून घेणार का? या प्रश्‍नावर देखील त्यांनी बोलणे टाळले. भाजपच्या टोल फ्री क्रमांकावर डायल करून कुणीही भाजपचा सदस्य होऊ शकतो असे सांगत त्यांनी मिश्‍किल हास्यही केले.

केंद्रात मोदी तर राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत देखील भाजपचाच नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणार आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने कणकवलीकर भाजपलाच पसंती देतील, असे श्री. चव्हाण म्हणाले.

संदेश पारकर यांना नारायण राणे यांनी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन त्यांना राज्यस्तरावर आणले होते; पण भाजपने नगराध्यक्षपदावर उभे करून त्यांना जिल्हास्तरावर आणले आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट करण्यासाठीच ही खेळी करण्यात आली का? या प्रश्‍नावर बोलताना श्री. चव्हाण यांनी पुढील काळात पक्षात अनेक संधी निर्माण होणार आहेत. त्यावेळी श्री. पारकर यांच्या नावाचा निश्‍चितपणे विचार होईल. त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने इथे मोठमोठ्या संधी आहेत, असेही ते म्हणाले.

नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवणार
भाजप पक्षाने आपणाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून मोठी जबाबदारी दिली आहे. नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवून आपण हा विश्‍वास सार्थकी लावणार आहोत. याखेरीज शहरवासीयांना भ्रष्टाचारमुक्‍त कारभार देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. या निवडणुकीत आम्ही सर्व कार्यकर्ते एकसंधपणे सामोरे जात असून नगराध्यक्षसह सर्वच जागा जिंकणार असल्याचे संदेश पारकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com