सावंतवाडी टर्मिनसचे काम थांबू देणार नाही - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

सावंतवाडी - जिल्ह्याला आदर्श ठरणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे दिली.

सावंतवाडी - जिल्ह्याला आदर्श ठरणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे दिली. ज्या प्रभूंनी कधीही होऊ न शकणारे टर्मिनस या ठिकाणी विशेष मान्यता घेऊन आणले आणि आपल्या मंत्री कोकण रेल्वेचा विकास केला त्यांच्यावर टीका होणे, दुर्दैवी आहे, असेही तेली यांनी सांगितले.

तालुका शिवसेनेच्यावतीने येथे पत्रकार परिषद घेवून प्रभू यांच्यावर टीका केली होती. त्याला श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेवून उत्तर दिले.

श्री. तेली म्हणाले, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिला नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भूमिका घेतली होती; मात्र श्री. प्रभू रेल्वे मंत्री होताच टर्मिनस मंजूर करून त्याचे कामही सुरू केले. हे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्याबाबत आपण प्रभूंचे लक्ष वेधले असता प्रभूंनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.’’

प्रभूंनी आपल्या कार्यकाळात नवी १२ रेल्वे स्थानके आणली. विद्युतीकरणासाठी ८८ कोटी तसेच रेल्वे दुपदरीकरणासाठी ४०० कोटींची तरतुद केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन वैभववाडी-कोल्हापूर, चिपळूण-कराड हे नवे मार्ग मंजूर केले. असे असताना प्रभू लोकांची फसवणुक करत असल्याचा शिवसेनेचा आरोप चुकीचा आहे.

- राजन तेली, भाजपचे प्रदेश सरचिटणीस

जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार शिवसेनेचेच आहेत, असे असताना शिवसेनेने आपले निवेदन स्टेशन मास्तरांना देणे दुर्दैवी आहे. याकडे पालकमंत्री किंवा खासदारांचे लक्ष वेधले असते तर त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्याचे किंवा बैठक घेण्याचे अधिकार आहेत, असेही श्री. तेली म्हणाले.

गोवा मेडीकल कॉलेजमधील शुल्क आकारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे लक्ष वेधणार आहे. येथील रूग्णांना दिनदयाळ उपाध्याय आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करणार आहे. शिवाय नारायण राणे यांच्या रूग्णालयाला तत्काळ मंजुरी देण्याची देणयाची मागणी करणार आहोत. या रुग्णालयात रुग्णांना जास्त खर्च होऊ नये, यासाठी शासनाने पैशाची तरतूद करावी, अशी मागणी करणार असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Sawantwadi Turminus work issue