मालवणात पर्यटकांना हवाई सफर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

मालवण - कोकण किनारपट्टीवरील पहिल्या हेलिकॉप्टर सफर उपक्रमाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. हेलिकॉप्टर सफर म्हणजे जणू स्वर्गाची सफर असल्याची भावना यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

मालवण - कोकण किनारपट्टीवरील पहिल्या हेलिकॉप्टर सफर उपक्रमाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. हेलिकॉप्टर सफर म्हणजे जणू स्वर्गाची सफर असल्याची भावना यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी रंजना गगे, महाराष्ट्र स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, शहराध्यक्ष लीलाधर पराडकर, वायरी सरपंच घनश्‍याम ढोके, नगरसेवक नितीन वाळके, आयोजक रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, रश्‍मीन रोगे, नकुल पार्सेकर, माऊली धारवटकर आदी उपस्थित होते. हेलिकॉप्टर सफर उपक्रमास पहिल्या दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी वयोवृद्ध महिलांनीही हेलिकॉप्टर सफर केल्याचे दिसून आले. 

स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्टस्‌, पॅरासेलिंग आदी समुद्री पर्यटनाकडे पर्यटक आकर्षिले जात असताना युवा पर्यटन व्यावसायिक रूपेश प्रभू, अन्वय प्रभू व रश्‍मीन रोगे यांनी पर्यटकांना हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्ग सफर ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. या हेलिकॉप्टर सफरमधून पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्ग व किनारपट्टीचे मनमोहक दृश्‍य अवकाशातून लुटता येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या पहिल्या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी १०० हून अधिक पर्यटक व जिल्हावासीयांनी सफरीचा आनंद लुटला. उद्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सांगता होणार असून पर्यटकांची व जिल्हावासीयांची मागणी असल्यास पुन्हा हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती अन्वय प्रभू यांनी दिली.

दरम्यान हेलिकॉप्टर सफर उपक्रमास आमदार वैभव नाईक यांनी भेट देत सफरीचा आनंद लुटला. रूपेश व अन्वय प्रभू यांनी उचललेले हे धाडसी पाऊल आहे. पर्यटकांचाही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. येथील पर्यटनवाढीस व अशा अनोख्या उपक्रमास नेहमीच आपला पाठिंबा राहील, असे सांगून हेलिकॉप्टर सफर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Tourism in Malvan