सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: बापूसाहेब महाराजांची महायुद्धातील कर्तबगारी

बापूसाहेबांच्या महायुद्धातील कामगिरीविषयी फार कमी संदर्भ उपलब्ध आहेत.
sindhdurg
sindhdurg Sakal

बापूसाहेब महाराजांनी दुसऱ्या महायुद्धात केलेल्या कामगिरीचे फार थोडे संदर्भ उपलब्ध आहेत; मात्र जे संदर्भ मिळतात त्यात ते युद्धात किती सक्रिय होते याची प्रचिती येते. त्यांच्याकडे प्रामुख्याने सैन्याला बॉम्ब फेकायला शिकवण्याचे काम होते. हे जोखमीचे काम लिलया पेलण्याबरोबरच त्यांनी आपल्या अमोघ वाणीने आणि नेतृत्व गुणांनी ११६ मराठा लाईफ इन्फंट्रीमधील सैनिक, अधिकाऱ्यांवर प्रभाव पाडला.

बापूसाहेब महाराज मेसापोटिमिया येथे त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर झाले. त्या फलटणीत ते हुद्देदार होते. त्यांचे प्रमुख कर्नल ए. एच. ब्रिजेस हे होते. लढाईवर मराठा राजा आला याचे अधिकारी आणि सैनिकांना खूप कौतुक होते. राजा असूनही बापूसाहेबांची वागणूक, रूबाब हा चटकन मनात भरावा आणि प्रत्येकाला आपलसं करावा असाच होता. त्यांच्याकडे प्रामुख्याने बॉम्बिंगचे काम होते. शिवाय वाहतूक खात्याचेही ते अधिकारी होते. त्या काळात आधुनिक शस्त्र वापराविषयी सैनिकांना फारसे माहित नव्हते. बंदुकीची गोळी झाडली की, त्यावर संगीन चढवून शत्रूवर धावून जाणे म्हणजेच युद्ध, असा समज सैनिकांमध्ये सर्वश्रृत होता. बॉम्ब फेकणे हा प्रकार तसा नविनच होता. तेच शिकवण्याचे काम बापूसाहेबांकडे होते. हे काम फार धोकादायक आणि विस्तवाशी खेळण्यासारखे असायचे. प्रशिक्षण देताना बॉम्ब फुटला तर मोठा अनर्थ होण्याची भीती असायची.

sindhdurg
सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; राजाच्या दर्शनासाठी प्रजेची व्याकुळता

बापूसाहेबांच्या महायुद्धातील कामगिरीविषयी फार कमी संदर्भ उपलब्ध आहेत. त्यांच्या सोबत त्याच फलटणीत काम केलेले हवालदार बाळकृष्ण कदम-सरंबळकर यांनी सांगितलेले काही संदर्भ मंगेश वैद्य यांच्या ‘श्रीमंत बापूसाहेब महाराजांचे चरीत्र व आठवणी’ या पुस्तकात आहेत. यानुसार युद्धावर हजर होण्याआधी बापूसाहेब मराठा रेजीमेंटच्या पुणे येथील कार्यालयात हजर झाले होते. त्या दिवशी हवालदार कदम सरंबळकर हे ड्युटीवर होते. सकाळी ११च्या दरम्यान महाराज खाकी युरोपीयन पोषाखात तेथे आले आणि ११६ मराठा रेजिमेंट डेपोचे ऑफिस कुठे आहे असे विचारले. कदम सरंबळकर यांनी कामात गर्क असतानाच वर न पाहता हेच ऑफिस असल्याचे त्यांना सांगितले. बापूसाहेबांनी आपले व्हिजीटींग कार्ड त्यांच्याकडे देवून कमांडींग ऑफिसरना देण्यास सांगितले. ते कार्ड न वाचता कदम सरंबळकर यांनी ऑफिसरच्या टेबलवर नेवून ठेवले. महाराज तेथे उभेच होते. पाचच मिनिटांत त्यांना ऑफिसरकडून बोलावणे आले. तेथे कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा महाराज बाहेर आले. यावेळी नाव बघीतल्यानंतर कदम सरंबळकर यांना हे आपले महाराज असल्याचे लक्षात आले. त्यांना त्यांनी बसायलाही सांगितले नव्हते. त्यांची त्यांनी माफी मागितली. त्यावर महाराजांनी हसून उलट त्यांचीच चौकशी केली.

महाराज असलेल्या रेजिमेंटमध्येच कदम सरंबळकर हे कार्यरत होते. त्यांनी दिलेल्या संदर्भानुसार, एकदा बापूसाहेब महाराज बॉम्ब थ्रोईंग प्रॅक्टीस करत होते. यावेळी या बटालियनमधील सुभेदार मेजर सोंडकर यांना आपणसुद्धा बॉम्ब फेकून पहावा असे वाटले. त्यांनी सेफ्टी पीन काढून बॉम्ब फेकला; मात्र तो अगदी जवळ पडला. यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात येणार होते. महाराजांनी प्रसंगावधान राखत त्या जिवंत बॉम्बवर झडप घालून तो उचलून बाहेर फेकला. काही क्षणातच तो फुटला; मात्र अनेकांचे प्राण वाचले. एकदा शत्रूच्या हवाई जहाजातील बॉम्बच्या स्कलने महाराजांचा हात जखमी झाला.

लढाईची धामधुम चालू असताना मुंबईचे गर्व्हनर लॉर्ड विलिंग्डन हे काही कामासाठी बगदादला गेले होते. तेथे त्यांनी बापूसाहेब महाराजांना मुद्दाम भेटीसाठी बोलवून घेतले. लढाईचे वातावरण कसे काय आहे? आवडले का? असा प्रश्‍न त्यांनी महाराजांना केला. यावर त्यांनी फारच छान असे उत्तर दिले. निरोप घेताना ‘लढाई संपेपर्यंत मला इथेच राहू द्या, मधूनच काहीतरी निमित्ताने परत बोलवू नका’ अशी विनंती करायला बापूसाहेब महाराज विसरले नाहीत. यावरून ते युद्धातही किती समरसतेने सामिल झाले होते, याची प्रचिती येते. महायुद्धा ११ नोव्हेंबर १९१८ ला थांबले. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला; मात्र सगळ्या फलटणी परत मायदेशी पोहोचायला तीन-चार महिन्यांचा अवधी लागला. बापूसाहेब आपल्या फलटणीसोबत ४ मार्च १९१९ ला मुंबई बंदरात परतले. मुंबईत त्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक सावंतवाडीकर उपस्थित होते.

तरुणांसाठी आयडॉल

बापूसाहेब महाराज युद्धावर गेल्याचा प्रभाव सावंतवाडी संस्थानात भरतीच्या रुपाने दिसला. लढाईच्या चार वर्षांच्या काळात सावंतवाडीतून तब्बल २,२२१ तरुण सैन्यात भरती झाले. अल्प लोकसंख्येचा विचार करता ही संख्या खूपच जास्त म्हणावी लागेल. जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात यावे, असे पत्र ते सावंतवाडीत प्रशासकांना पाठवत. महाराज युद्धावर गेले त्यावर्षी विक्रमी भरती झाली. त्या आधीची आणि नंतरची आकडेवारी बघितल्यावर याची प्रचिती येते. सावंतवाडी संस्थानात १९१४-१५ ला १८४, १९१५-१६ ला २३३, महाराज युद्धावर जायला निघाले त्यावर्षी १९१६-१७ ला ४२१, १९१७-१८ ला ९८६ आणि १९१८-१९ ला ३९७ तरुण युद्धात सहभागी झाले. या काळात ११ जणांनी विविध बहुमान, पदके मिळवली.

सावंतवाडीकरांचा सहभाग

महायुद्धकाळात ब्रिटिशांनी युद्धकर्जासाठी आवाहन केले होते. यात सावंतवाडीच्या जनतेने सरकारला भरीव मदत केली. संस्थानमधून एकूण ३ लाख ३८ हजाराचे कर्जरोखे घेण्यात आले. शिवाय विविध मदत फंडातून सुमारे २७ हजार जमवून देण्यात आले. फकिरसाहेब हेरेकर या कारखानदाराने लोकरीचे मोजे, टोप्या, हातमोजे आदी वस्तू बनवून लष्करी खात्याला पुरवल्या. याची किंमत दीड लाख होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com