सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: सावंतवाडीकरांचे महाराज संस्थानात परतले

प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या दिशेने आता प्रवास सुरू झाला
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणाsakal

युद्धाहून परतलेल्या पंचम खेमराज (Pancham khemraj) ऊर्फ बापूसाहेब महाराजांचे सावंतवाडीकर (Sawantwadi) जनतेने जंगी स्वागत केले. त्यांचा नागरी सत्कार, गावोगाव जंगी समारंभ, मानपत्र याचे भरगच्च आयोजन केले गेले. या स्वागतातून सावंतवाडीकरांच्या भावी राजाबद्दलच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या अपेक्षा पावला पावलावर जाणवत होत्या. प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या दिशेने आता प्रवास सुरू झाला होता.

Summary

लढाईवर हट्टाने गेलेला आपला राजा पराक्रम गाजवून सुखरूप परत आला ही सावंतवाडीकरांसाठी खूप मोठी गोष्ट होती.

लढाईवर हट्टाने गेलेला आपला राजा पराक्रम गाजवून सुखरूप परत आला ही सावंतवाडीकरांसाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. या उत्कट प्रेमामागे जनतेची आणखी एक भावना लपलेली होती. ब्रिटिशांनी कारभार हातात घेतल्यापासून गेली जवळपास ७५ वर्षे राजा नामधारीचे होते. यात राजनिष्ठा जपलेल्या सावंतवाडीकरांची घुसमट होत होती. बापूसाहेब महाराजांच्या रुपाने त्यांना प्रत्यक्ष राजा लाभेल, अशी अपेक्षा वाटू लागली होती. महायुद्धातील सहभाग विलायतेतील शिक्षण आणि आतापर्यंतचा एकूणच प्रवास यामुळे त्यांची ही अपेक्षा वास्तवात उतरेल अशी आशा आणखी दृढ झाली होती. त्यांच्या मनातला राजा आपल्या राज्यात परतत होता.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: लष्करात जाण्यासाठी बापूसाहेबांचा संघर्ष

बापूसाहेबांच्या स्वागताचा मुख्य कार्यक्रम सावंतवाडीत ठरला. पूर्ण शहर पताकांनी सजवला गेला. आपल्या राजाला डोळे भरून पाहण्यासाठी प्रजेच्या डोळ्यात प्राण एकवटले होते. महाराज सावंतवाडीत दाखल झाले तेव्हा शहरातल्या रस्त्यांवर पाऊल ठेवायला जागा नव्हती, इतकी गर्दी उसळल्याचे संदर्भ मिळतात. राजवाडा परिसरातील केळबागेत खास मंडप उभारण्यात आला. या स्वागत कार्यक्रमात सावंतवाडीकरांच्या वतीने रौप्य करंडकातून मानपत्र अर्पण करण्यत आले. या मुख्य सभारंभाशिवाय शहरात इतरही अनेक सत्कार झाले.

बापूसाहेबांना संस्थानातील गावागावांतून निमंत्रणे येऊ लागली. प्रजेचा आग्रह महाराजांना मोडवेना. शक्य आहे तिथे ते पोहोचू लागले. प्रत्येक गावात त्यांचे थाटात स्वागत होई. गाव सुशोभित केला जायचा. मोठी सभा भरवून गावकऱ्यांतर्फे मानपत्र, सत्कार व्हायचा. २९ मार्च १९१९ ला बांद्यात असाच जंगी सत्कार झाला. यावेळी बांदावासीयांतर्फे दिलेल्या मानपत्राचा मजकूर उपलब्ध आहे. धोंडदेव गायतोंडे, जयराम सुभेदार, बाबासाहेब देसाई, सखाराम देसाई-लाडगावकर, भिकाजी वालावलकर, इसाक खां सुभेदार, आप्पा महाजन, शांताराम नाडकर्णी, कृष्णा तोरसकर आदींनी हे मानपत्र प्रदान केले होते. त्यातला आशय असा होता, युरोपीय महायुद्ध विराम पावल्याने समरांगणावरून विजयश्रीयुक्त होऊन आपण परत राजधानीत सुखरूप होऊन पोहोचला. अत्यंत हर्षभरीत होऊन आम्ही बांदा पेट्यातील समस्त नागरिकांतर्फे आपल्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत.

आधीच लढाईमुळे उत्पन्न झालेल्या महर्गतेत चालू साली दुष्काळाने जास्त भर टाकली आहे. अन्नपाण्याच्या तुटवड्यासंबंधी गरीब प्रजा अतिशय चिंतातूर झाली आहे. साथीच्या तापामुळे प्रजेस कष्टमय दिवस कंठावे लागले होते. तथापि, आपल्या शुभ आगमनामुळे त्या संकट काळाचा किंचित विसर पडून सर्व प्रजा आनंदीत झाली आहे. दीड वर्षापूर्वी संस्थानात आपले आगमन झाले. त्यावेळी लागलीच राजसूत्र हाती घेऊन लोकहीत व आबादानीची कामे करताना आपणास केव्हा पाहू अशा विषयी सर्व प्रजा आतुर झाली होती; पण त्यावेळी महायुद्धाचा प्रलयाग्नी पश्‍चिमेकडून पूर्व दिशेस फैलावत येतो की काय, अशी भीतीयुक्त परिस्थिती दिसत होती. अशा आणीबाणीच्या समयी साम्राज्य सरकारास मदत करण्याचे कार्य प्रथम हाती घेण्याचा आपण निर्णय घेतला. प्रत्यक्ष समरभूमीवर शारीरिक कष्ट सोसून धैर्याने शत्रूस जेरीस आणले. आम्हा प्रजेला याचा मोठा अभिमान वाटत आहे.

महाराज आपण उच्च दर्जाचे शिक्षण संपादन करून व बाहुबलाच्या प्रतापाचा त्यावर सोनेरी कळस चढवून सर्वांगसुंदर पात्रता आपल्या अंगी असल्याचे साम्राज्य सरकारच्या व अखिल जनतेच्या निदर्शनास आणले ही गोष्ट आमच्या संस्थानास फार भूषणावह आहे. परमेश्‍वर आपल्याला चिरायू आयुष्य देवो, अशी प्रभूपार्थ प्रार्थना करतो. या मानपत्रात त्यावेळी असलेली सार्वजनिक आरोग्य, दुष्काळ याची स्थिती अशी होती याची कल्पना येते. बापूसाहेबांनी प्रत्यक्ष कारभार हाती घ्यावा म्हणून लोक उत्सुक होते हेही लक्षात येते. इतकी वर्षे दूर असूनही आपल्या राजाबद्दलचे लोकांचे प्रेमही ठळक होते. महाराज युद्धाहून परतल्यावर ब्रिटिशांनीही त्यांना भावी राजा म्हणून आवश्यक पावले उचलायला सुरुवात केली. मुंबई गव्हर्नरनी त्यांना राज्यकारभारासाठी आवश्यक असे मुलकी व न्यायखात्याचे शिक्षण घेण्याविषयी सूचना केली. महाराजांनाही तसेच हवे होते. कारभार चालवायला प्रत्यक्ष अनुभवांची गरज असते. नुसती रितीरिवाजांची किंवा कायदेकानूनाची माहिती असून चालत नाही.

प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याची, पद्धती समजून घेण्याची गरज असल्याचे महाराजांचे मत होते. त्या काळात बेळगावच्या पॉलिटिकल एजंटवर सावंतवाडीच्या कारभाराची अतिरिक्त जबाबदारी होती. त्यांच्या खास देखरेखीखाली महाराजांनी राज्यकारभाराचे प्रत्यक्ष ज्ञान घेण्यास सुरुवात केली. बेळगावजवळील हिंडलगे येथे संस्थानच्या बंगल्यात राहून ते बेळगावच्या डिस्ट्रिक्ट व सेशन जजच्या कोर्टात खटले व अपिले ऐकण्यास जात. अधूनमधून बेळगाव कलेक्टरबरोबर ते दौऱ्यावर जात. जमीन मोजनीचे ज्ञान घेण्यासाठी ते राजा असूनही सर्व्हे अंमलदाराबरोबर प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी जात. लॅण्ड रेव्हिन्यू रेकॉर्ड खात्याचेही त्यांनी प्रत्यक्ष ज्ञान घेतले. कोणत्याही विभागाचे अतिशय बारकाईने ज्ञान घेण्याची त्यांची सवय होती. मुलकी खात्यातील हिशोब ज्ञानाबाबत तर त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला. जवळपास अडीच तीन वर्षानी म्हणजे १९२२ च्या सुरुवातीला त्यांनी राज्य व्यवहारी ज्ञानाचा अभ्यास पूर्ण केला.

हिज हायनेस बहुमान प्रदान

महायुद्धातील पराक्रमाबद्दल इंग्लंडचे बादशहा पाचवे जॉर्ज यांनी श्रीमंत बापूसाहेबांना जुलै १९१९ मध्ये सन्मानित कॅप्टनचा हुद्दा बहाल केला. ज्या फलटणीत अधिकारी म्हणून ते युद्ध लढले त्यात त्यांचा हा हुद्दा कायम रहावा, असे आदेश त्यांनी काढले. याचवेळी ‘हिज हायनेस’ असे संबोधण्याचा मानही त्यांना दिला.

११ तोफांचा मान

सावंतवाडीच्या संस्थानाधिपतींना ९ तोफांचा मान होता. इंग्लंडचे बादशहा पंचम जॉर्ज यांनी श्रीमंतांना १ जानेवारी १९२१ ला ११ तोफांच्या स्थानिक सलामीचा मान देऊन त्यांच्या वैयक्तिक गौरवात भर टाकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com