esakal | सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीच्या कारभारी बदलाची मालिका
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीच्या कारभारी बदलाची मालिका

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीच्या कारभारी बदलाची मालिका

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : मुख्य प्रधान अर्थात कारभारी वारंवार बदलल्यामुळे मधल्याकाळात सावंतवाडीचा (savantwadi) कारभार काहीसा विस्कळीत झाला. धोरणात्मक निर्णयामध्ये झालेल्या वारंवारच्या बदलामुळे काहीशी अव्यवस्था निर्माण झाली. पुढे पोर्तुगीजांनी (Portuguese) पुन्हा डोके वर काढले. त्यांच्याशी सावंतवाडीकरांना तब्बल दोन वर्षापेक्षा जास्त संघर्ष करावा लागला. यात सावंतवाडीचे बरेच आर्थिक नुकसान झाले.

तिसरे खेम सावंत साधारण वयात आल्यानंतर त्यांनी आणि राजमाता जानकीबाई यांनी 1763 मध्ये जीवाजी विश्राम सबनीस यांना मुख्यप्रधान पदावरून दूर करून रघुनाथ दळवी भोसले यांना नियुक्त केले. यानंतर सदाशिव नारायण चिटणीस, अनंत रामभट्ट आरोसकर यांना कारभारी नेमले. त्यांनी एक वर्ष काम केल्यावर पुन्हा जीवाजी सबनीस यांना नियुक्त केले. परत दीड वर्षाने त्यांना दूर करून सकू फर्जंद यांना कारभारी केले. त्यानंतर लक्ष्मण नारायण लेले, सदाशिव रामचंद्र सबनीस, हिरो रामशेट, लक्ष्मण नारायण दातार, सदाशिवपंत काळे, लक्ष्मण नारायण देशमुख, विठ्ठल विश्राम सबनीस, सांतोराम आकेरकर, फंटभट नातू, गोपाळराव अनंत सबनीस, भिमाजी कडवाडकर, जीवाजी कृष्ण नेरूरकर, विष्णू व्यंकटेश कामत, विठ्ठल नारायण रेगे आरवलीकर अशी कारभार्‍यांची लांबलचक यादीच तयार झाली. वारंवार कारभारी बदलल्यामुळे राज्यकारभारात काहीशी अव्यवस्था निर्माण झाली.

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळात कळंबटे आजोबा ठरले हिरो, जीव धोक्यात घालून वाचवला नातवाचा प्राण

सबनीस हे परंपरेने कारभाराचे काम पाहणारे होते. तरीही जीवाजी सबनीस यांना या पदापासून दूर जावे लागले. 1771 मध्ये त्यांनी कारभारीपद सोडून ते अन्यत्र राहायला गेले. पुढे 1772 मध्ये ते केरी येथे राहायला आले. त्याकाळातील पेशवे माधवराव बल्लाळ यांनी तिसरे खेम सावंत यांचे चुलत आजोबा सोम सावंत आणि जीवाजी सबनीस यांना एकत्र आणून संस्थानच्या कारभाराची घडी बसवण्याविषयी सल्ला दिला होता; मात्र त्यावर पुढे फारसे काही झाले नाही. पुढे पेशव्यांनी जीवाजी सबनीस यांना आपल्या दरबारात रहायला बोलावले; मात्र सबनीस सावंतवाडी संस्थानशी एकनिष्ठ असल्याने त्यांनी सावंतवाडी संस्थानातच रहावे पसंत केले.

1770 च्या दरम्यान तिसरे खेमसावंत यांच्या सासू सखुबाई शिंदे यांनीही त्यांना पत्र पाठवून सावंतवाडीत परतण्याचे आवाहन केले. ते परत आले आणि मुख्य प्रधान म्हणून काम करू लागले; मात्र जवळपास वर्षभरच त्यांनी काम केले. जीवाजी सबनीस यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र शिवराम सबनीस आणि पुढे शिवराम यांचे पूत्र माधवराव सबनीस यांनीही काही काळ मुख्य प्रधान म्हणून काम केले. 1774 मध्ये सदाशिव रामचंद्र यांना कारभारी म्हणून नेमण्यात आले.

पुढच्या काळात पोर्तुगीजांनी पुन्हा उचल खाल्ली. सावंतवाडीकर आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहानुसार आठ वर्षे त्यांना खंडणी मिळाली नव्हती. शिवाय सावंतवाडीकरांच्या आरमाराचा पोर्तुगीज जहाजांना त्रास होत होता. आताच्या गोवा हद्दीतील पोर्तुगीजांचे मांडलीक झालेल्या देसाईंकडून (तेथे नियुक्त प्रमुख) सावंतवाडीकरही खंड वसूल करू लागले होते. याचा पोर्तुगीज सरकारला राग होता. त्यांनी सेनापती फ्रेडरीक गिलेर्म यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीकरांवर हल्ल्यासाठी सैन्य पाठवले. 25 ऑक्टोबर 1781 ला या सैन्याने डिचोलीच्या किल्ल्याला वेढा देत तो सर केला. दुसर्‍याच दिवशी साखळीवर हल्ला करत त्या काळातील तेथील देसाईंचे गडासारखे मजबूत असलेले घर ताब्यात घेतले. हे दोन्ही भाग पोर्तुगीज राज्याला जोडले.

हेही वाचा: शिवसेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी: 'माझा डॉक्टर संकल्पना' कोल्हापूर जिल्ह्यात राबवा

सावंतवाडीकरांनी याला उत्तर देण्यासाठी पुढे सैन्याची जमवाजमव केली. 1 ऑक्टोबर 1782 ला त्यांचे सैन्य गोव्यातील गुळुले येथे पोहोचले आणि तळ ठोकला. दुसर्‍या दिवशी त्यांनी धुमाशे आणि साळ ही गावे ताब्यात घेतली. पोर्तुगीज सैन्याने प्रती हल्ला सुरू केला. ठिकठिकाणी दोन्ही सैन्यात चकमकी झाल्या. यावेळी सावंतवाडीकरांचे मोठे सैन्य बार्देशात होते. 22 ऑक्टोबर 1782 ला या दोन्ही सैन्याची बार्देशमधील माकझान नदीच्या काठावर गाठ पडली. दोन्ही सैन्यात मोठी लढाई झाली; मात्र जय-पराजय असा कोणाचाच झाला नाही. पोर्तुगीजांनी मागच्या बाजूने येवून सावंतवाडीकरांवर अनेकदा हल्ले केले. याच दरम्यान सावंतवाडीकरांसाठी इतर सैन्याची मदत येवून पोहोचली. त्यामुळे पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागली. या विजयानंतर सावंतवाडीकरांच्या सैन्याने पुढे जात अनेक गावे जाळली.

24 नोव्हेंबर 1782 ला त्यांनी साखळीच्या किल्ल्यावर हल्ला केला. त्यांनी बराचकाळ किल्ल्याला वेढा दिला; मात्र 7 डिसेंबर 1782 ला पोर्तुगीजांना बाहेरून मदत पोहोचली. त्यांनी सावंतवाडीकरांवर प्रतिहल्ला केला. सुमारे सव्वादोनतास झालेल्या लढाईत पोर्तुगीजांची सरशी झाली. सावंतवाडीकरांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. यात सावंतवाडीकरांचे बरेच नुकसान झाले. पोर्तुगीजांनी साखळी किल्ल्यावर संरक्षणासाठी काही लोक ठेवून डिचोलीकडे आणि तेथून बार्देशच्या हद्दीवर सैन्य पाठवले. आग्वादसह इतर किल्ल्यांवर आपले लोक तैनात केले. पुढे 18 जानेवारी 1783 ला सावंतवाडीकरांनी चार हजार पायदळ आणि काही घोडेस्वार घेवून डिचोली किल्ल्याच्या दिशेने कूच केली. त्यांनी केरीच्या किल्ल्यावर हल्ला केला; मात्र तो किल्ला त्यांच्या हाती लागला नाही. तोटा मात्र झाला.

हेही वाचा: आईचा मृत्यू, मुलगा पॉझिटिव्ह असल्यानं डॉक्टरनेच दिला अग्नी

पुढे पोर्तुगीजांनी बार्देशमधून सैन्य मागवून सावंतवाडीकरांनवर चाल केली. त्यांचे काही सैन्य हळर्ण येथील नदीच्या दोन्ही तटावर येवून राहिले. तेथून मणेरी येथे असलेल्या सावंतवाडीकरांच्या मुख्य सैन्याच्या ठाण्यावर हल्ला केला. यात सावंतवाडीकरांना माघार घ्यावी लागली. पुढे पोर्तुगीजांनी हळर्ण, मर्दनगड आदी ठिकाणी आपला अंमल बसवला. जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त काळ चाललेल्या या लढाईचा येथे शेवट झाला.