
आंबोली गावातही तो महिन्याभरापासून केव्हा तरी फिरकायचा; मात्र घाटात त्या पाईपमध्ये तो रात्रीचा राहायचा. पोलिसांनी तीन-चारवेळा शोध घेतल्यावर तो सापडला.
आंबोली - मानसिक संतुलन बिघडल्याने येथे फिरत असलेल्या एकाला पोलिसांनी चौकशी करून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याच्या मूळ परभणी गावात रवानगी केली. वर्षभरानंतर भावाची भेट घडवून आणल्याबद्दल परभणीतील त्याच्या भावांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
आंबोली घाटात गेले काही दिवस मानसिक संतुलन बिघडलेला 35 वर्षाचा तरूण एका उघड्या मोठ्या पाईपमध्ये झोपत असल्याचे पोलीस जमादार आत्माराम तेली यांच्या लक्षात आले. आंबोली गावातही तो महिन्याभरापासून केव्हा तरी फिरकायचा; मात्र घाटात त्या पाईपमध्ये तो रात्रीचा राहायचा. पोलिसांनी तीन-चारवेळा शोध घेतल्यावर तो सापडला. आंबोली पोलिसांनी त्याची विचारपुस केली. त्यावेळी त्याने आपले नाव, पत्ता व नातेवाईकांचा मोबाइल नंबर लिहून दिला. त्यावरून त्याच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला. त्याचा भाऊ आंबोली पोलीस स्थानकात आला. पोलिसांनी त्याची भेट घडवली. यावेळी तो वर्षभरापासून बेपत्ता असल्याचे भावाने सांगितले. तो मोलमजुरी करत असून त्याला एक मुलगी आहे; मात्र पत्नी सोडून गेल्याचे त्याच्या भावाने सांगितले. संबंधित तरूणाने आपण गोव्यातून इथे आल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीबद्दल त्या कुटुंबाने आभार मानले. येथील सहायक उपनिरीक्षक आत्माराम तेली, हवालदार दत्ता देसाई, सुनील भोगण, दीपक शिंदे, अभिराज कांबळे यांनी त्या तरूणाची विचारपुस केली अन तो आपल्या घरी गेला.
संपादन - धनाजी सुर्वे