esakal | सिंधुदुर्गात पावसाचा कहर सुरूच; बांदा आळवाडीत पाणी, माणगाव खोऱ्याशी संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात पावसाचा कहर सुरूच; माणगाव खोऱ्याशी संपर्क तुटला

सिंधुदुर्गात पावसाचा कहर सुरूच; माणगाव खोऱ्याशी संपर्क तुटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गात (Sindhudurg) पावसाचा कहर आजही दिवसभर सुरूच होता. संततधारेमुळे जिल्ह्याच्या काही भागात पूरस्थिती आहे. बांदा (Banda) आळवाडी भागात पाणी घुसले. माणगाव खोऱ्याला (mangaon valley) जोडणाऱ्या आंबेरी पुलासह जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी पुराचे पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. (sindhudurg-rain-update-banda-lost-contact-mangaon-valley-akb84)

जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचे धुमशान सुरू राहिले. सह्याद्रीच्या रांगांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. सर्वाधिक फटका बांद्याला बसला. शहरात आळवाडी, निमजगा भागात तेरेखोल नदीचे पाणी घुसले. तेथील रहिवासी व व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षितस्थळी हलविले. आळवाडी-निमजगा रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला. इन्सुली सावंतटेंब येथे पाणी भरल्याने बांदा-सावंतवाडी मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प होती. शेर्ले जुने कापईपूल दिवसभर पाण्याखाली होते. ओटवणे जवळील सरमळे पुलावर पाणी आल्याने दाणोली बावळाट मार्गे बांदा वाहतूक ठप्प झाली.

कुडाळ शहरालगतच्या आंबेडकरनगर व इतर भागात पाण्याने धोक्याची पातळी गाठली. माणगाव खोऱ्यातील आंबेरी नदीवरील पुलावरून दुपारी तीनपासून पाणी वाहत होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पाण्याचा प्रवाह वाढतच होता. त्याने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला. दोडामार्ग तालुक्यात तिलारी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. घोटगे परमे पूल पाण्याखाली गेला. परिणामी घोटगे परमेचा संपर्क तुटला आहे. मालवण तालुक्यातील नद्यांना पूर आला. अनेक ठिकाणी पाणी घुसले आहे. शहरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. दांडी, आडवण, वायरी भागात पाणी भरले होते. पावसाबरोबर अधूनमधून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याच्या तडाख्यात काही ठिकाणी झाडे कोसळली, तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले.

हेही वाचा- ‘टास्क फोर्स’कडील सूचनांच्या अंमलबजावणीतील कमतरता भोवली

सावंतवाडी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तळवडे होडावडा नदीला महापूर आला. होडावडा पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. आरोस दांडेली येथील पूलही पाण्याखाली गेला. वेंगुर्ले तालुक्यालाही पावसाचा जोरदार फटका बसला. देवगड तालुक्याच्या किनारपट्टी भागाला पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह दिवसभरात पाऊस कोसळत होता. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचे पाणी वाढल्याने विविध ठिकाणचा परिसर जलमय झाला होता. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यालाही पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

असा झाला पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मालवण तालुक्यात सर्वाधिक १५७ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १०९.८२ मिलिमीटर पाऊस झाला असून, एक जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी १६९६.३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये दोडामार्ग - १५० (१७५५), सावंतवाडी - १३०(१८८६.१०), वेंगुर्ले - १३१.६०(१४१७.४०), कुडाळ - ९०(१५१२), मालवण - १५७(१९२०), कणकवली - ७१(१७८४), देवगड - ६५(१५४३), वैभववाडी - ८४(१७५३) असा पाऊस झाला आहे.

अतिमुसळधार पावसाचे सावट कायम

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ ते १८ या कालावधीसाठी हा अंदाज आहे. त्यामुळे वरील कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

नद्यांची पातळी वाढतेय

खारेपाटण पुलाजवळ आज सायंकाळी साडेचारला मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी ६ मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी ८.५०० मीटर असून, धोका पातळी १०.५०० मीटर आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३९.९०० मीटर आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मीटर, धोका पातळी ४३.६०० मीटर इतकी आहे. कर्ली नदीची पातळी भंगसाळ नदी पुलाजवळ ७ मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी ९.९१० मीटर आणि धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे.

loading image