
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दमदार पावसाने पेरणीवरील संकट टळले
वैभववाडी : गेल्या तीन-चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे आज दुपारनंतर पुन्हा दमदार पुनरागमन झाले. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार असून, यापूर्वी केलेल्या पेरण्यांवरील संकट देखील टळणार आहे.
जिल्ह्यात १० जूनला मॉन्सूनचे आगमन झाले. सलग दोन दिवस जिल्ह्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली. पावसामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली. जिल्ह्यात ५० ते ६० टक्के पेरण्या उरकल्या. त्यानंतर मॉन्सूनचा प्रवाह पूर्णतः मंदावला होता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुबार पेरणीच्या संभाव्य संकटाने शेतकरी विचारांच्या गर्तेत सापडला होता.
दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण होते. सकाळी अकरापासून काही भागात हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली. दुपारी एकच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवलीच्या बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत सरींवर सरी कोसळत होत्या. वैभववाडी आणि कणकवलीच्या काही भागात तासभर दमदार पाऊस झाला. सह्याद्रीच्या पट्ट्यात जोर अधिक होता. इतर तालुक्यांमध्ये हलक्या सरी बरसल्या असल्या, तरी पेरण्यांना त्या पोषक आहेत. सायकांळी उशिरा पावसाने पुन्हा उघडीप दिली.
या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. यापूर्वी झालेल्या पावसात केलेल्या भातपेरणीवरील संकट या पावसाने टळले आहे. या पावसानंतर शेतीच्या कामांचा वेग वाढणार आहे. त्यातच पुढील दोन दिवस मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती असल्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांत पावसाची शक्यता
मॉन्सूनच्या प्रवाहातील अडथळे दूर झाले असून, पुढील एक-दोन दिवस चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.
Web Title: Sindhudurg Rains District Averted Crisis Over Sowing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..