सिंधुदुर्ग : राणीसाहेबांच्या उपचारासाठी अखेर युरोपात

राणीसाहेबांच्या आजारासंबंधीही त्यांनी अनेक ग्रंथ वाचले होते

Sindhudurg
Sindhudurg sakal

राणीसाहेबांच्या उपचारासाठी युरोपात जाण्याची तयारी पूर्ण झाली. १९ डिसेंबर १९३५ ला सकाळी अकराला त्यांना युरोपात घेऊन जाणारी ‘काँते व्हर्दे’ ही बोट मुंबई बंदरातून निघणार होती. राजपरिवाराला निरोप देण्यासाठी धार, अक्कलकोट, बडोदे, तोरखेड, फलटण आणि सावंतवाडी येथील आप्त, स्नेही, संस्थानचे काही अधिकारी, संस्थानातील प्रतििष्ठत नागरिक, मुंबईत स्थिरावलेले सावंतवाडी संस्थानातील चाकरमानी यांनी बंदर परिसरात गर्दी केली होती.

यावेळी महाराजांना अर्पण केलेल्या हारतुऱ्यांचा अक्षरशः ढीग जमा झाला होता. ‘जपून जा आणि लवकर परत या,’ अशा उपस्थितांच्या जिव्हाळ्याच्या शब्दांनी महाराजही गहिवरले. राणीसाहेबांच्या प्रकृतीविषयीची काळजी जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. खुद्द राणीसाहेबांनाही इतके प्रेमळ आप्तस्वकीय सोडून आपण काही काळासाठी का असेना परदेशात जातोय, याचे वाईट वाटत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. महाराजांची फारशी वेगळी मनस्थिती नव्हती.

बोट वेळेत निघाली. बोटीत चढल्यापासून राणीसाहेब केबिनच्या बाहेर फारशा आल्या नाहीत. महाराज आणि युवराज मात्र निरनिराळे खेळ खेळण्यास व पोहण्यासाठी जात असत. युवराजांनी बोटीवरील बऱ्याच प्रवाशांची ओळख केली. त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती घेण्यात त्यांना मजा वाटायची.

बोटीतील या सहप्रवासाविषयी महाराजांच्या सोबत गेलेल्या पथकातील दौऱ्यासाठी नियुक्त खासगी सचिव डॉ. जी. के. देशपांडे यांनी बरेच संदर्भ नोंदवून ठेवले आहेत. ते यात म्हणतात, ‘महाराजांसोबत प्रवास करायचा असल्याने मनावर बरेच दडपण होते. कारण बोटीत पाऊल ठेवेपर्यंत महाराजांशी फारसा परिचय नव्हता. बंदर सोडून बोट दूर जाताच महाराजांनी त्यांच्याजवळ येत त्यांना सिगारेट घेण्याविषयी आग्रह केला. त्यावेळीच नोकर आणि मालक यांच्यातील हिंदूस्थानात जपले जाणारे पारंपरिक नाते त्यांच्या मनात नसल्याची खात्री पटली. इतर प्रवाशांशीही महाराज समतेने आणि सन्मानाने वागत होते.

यामुळे फार कमी काळात ते बोटीवर लोकप्रिय झाले. राजा किंवा मालकाने इतरांना समानतेने वागवण्याची पद्धत युरोपात रूढ आहे. स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या गुणातून प्रस्थापित होत असतो. गर्व, उर्मट वागणुकीमुळे मोठेपणा मिळत नाही. महाराजांच्या वागण्यात कुठेच गर्व नव्हता. प्रेमळपणा, आपुलकीचा भाव आणि समानता यामुळे ते अधिक लवकर लोकप्रिय झाल्याचे डॉ. देशपांडे यांनी नमूद केले आहे. ते पुढे म्हणतात, राजपरिवाराला प्रथम व्हिएन्ना येथे जायचे होते.

महाराजांनी डॉ. देशपांडे यांना व्हिएन्ना आणि ऑस्ट्रीयन राज्याची माहिती देणारे पुस्तके देण्यास सांगितले. व्हिएन्ना शहरात पोहोचताच त्यांनी तिथला नकाशा, ऐतिहासिक माहिती व सद्यस्थितीबद्दलची पुस्तके मिळवून ती वाचली. तिथल्या लोकांच्या राहणीमान, प्रथापरंपरा यांचाही अभ्यास केला. राणीसाहेबांच्या आजारासंबंधीही त्यांनी अनेक ग्रंथ वाचले होते. यामुळे ते कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरशीही तासभर वादविवाद करू शकत होते. राजपरिवाराला घेऊन निघालेली बोट ३० डिसेंबरला व्हेनिस येथे पोहोचली.

तेथून सर्व परिवार व्हिएन्ना येथे गेले. मुंबईच्या डॉ. खानोलकर यांनी पूर्ण युरोप दौऱ्याचे नियोजन केले होते. त्यांनी सांगितल्यानुसार डॉ. रझेक व त्यांच्या पत्नी या परिवाराच्या स्वागतासाठी व्हिएन्ना स्टेशनवर हजर होते. राणीसाहेबांची प्रकृती तपासून डॉ. रझेक यांनी या सगळ्यांच्या राहण्याची सोय केली. कॉटेज सॅनॅटोरियम भागात त्यांची व्यवस्था होती. तेथेच वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ येऊन राणीसाहेबांची तपासणी करून जात. या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एक्सरे व त्या काळात उपलब्ध सर्व तपासण्या करण्यात आल्या. यावेळी मूत्राशयात कोणताच दोष नसल्याचे स्पष्ट झाले; मात्र पायलाईटीस हा आजार असल्याचे निदान झाले.

यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महाराजांनी आवश्यक ते सगळे उपचार करण्यास सांगितले. अखेर १२ जानेवारी १९३६ ला दुपारी शस्त्रक्रिया झाली. पहिले चार-पाच दिवस राणी साहेबांना खूप त्रास झाला. १६ जानेवारीपासून हळूहळू आराम पडू लागला. राणीसाहेब बराचकाळ विश्रांती घेत असायचे. या दरम्यान महाराजांनी व्हिएन्ना शहर पाहून घेतले. निरनिराळे कारखाने, घरांची बांधणी, विविध प्रदर्शने, संग्रहालये, चित्रप्रदर्शने पाहिली. त्यांच्यासोबत युवराज आणि राजकन्या हेमलता राजे असायच्या.

युरोपियन संगिताची आवड

महाराजांना युरोपियन संगिताची आवड होती. त्यांनी विद्यार्थी दशेत यातील काही ज्ञानही मिळवले होते. या दौऱ्यात त्यांनी ही आवडही जोपासत त्यात आणखी अभ्यास केला. व्हिएन्नामध्ये युरोपियन संगिताचे जगप्रसिद्ध ‘ऑपेरे’ होते. ते त्यांनी पाहून घेतले.

राणीसाहेबांच्या उपचारासाठी युरोपात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. राज्याधिकार हाती घेतल्यानंतर बापूसाहेब महाराजांचा हा पहिलाच मोठा परदेश दौरा होता. राणीसाहेबांच्या आजाराची चिंता होतीच; पण अशा आणीबाणीच्या स्थितीतही सावंतवाडी संस्थानसाठी काहीतरी नवे पाहता, शिकता येईल का याचा प्रयत्न त्यांच्या या दौऱ्यात दिसला. एक आदर्श पती आणि प्रजादक्ष राजा याचा सुवर्णमध्य काय असतो, हे समजून घ्यायचे झाल्यास महाराजांचा हा युरोप दौरा एक चांगले उदाहरण म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com