गोवेकर प्रकरणात उपरकरांनीच गोवल्याचा पडतेंचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

उपरकर यांनी नाहक आरोप करू नयेत, त्यांचे सर्व धंदे जनतेला माहित आहेत. त्यांच्या काही गोष्टी मलाही माहित असुन त्यांनी मला तोंड उघडायला लावु नये, अन्यथा त्यांचे सर्व पत्ते उघड केले जातील, असा इशारा शिवसेनेचे नुतन जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी उपरकर यांना दिला आहे.

कुडाळ - रमेश गोवेकरांचे काय झाले ? असे विचारणाऱ्या मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनीच मला त्या प्रकरणात नाहक गोवण्याचे षडयंत्र रचले होते. या प्रकरणात माझी सीबीआयपर्यंत चौकशी होऊन त्यात मी निर्दोष सुटलो आहे. त्यामुळे रमेश गोवेकरांचे काय झाले? हे जनतेला ज्ञात आहे. शिवाय शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील पदाधिकारी नेते मंडळी व शिवसैनिकांना विश्‍वासात घेऊनच जिल्हाप्रमुखपदी नेमणूक केली आहे. त्यामुळे उपरकर यांनी नाहक आरोप करू नयेत, त्यांचे सर्व धंदे जनतेला माहित आहेत. त्यांच्या काही गोष्टी मलाही माहित असुन त्यांनी मला तोंड उघडायला लावु नये, अन्यथा त्यांचे सर्व पत्ते उघड केले जातील, असा इशारा शिवसेनेचे नुतन जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी उपरकर यांना दिला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख पदी संजय पडते यांची नियुक्ती होताच मनसेचे माजी आमदार उपरकर यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांना जिल्हाप्रमुख पडते यांनी आज येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, धीरेंद्र चव्हाण, सतिश कुडाळकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

श्री. पडते पुढे म्हणाले, ""शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी नेते मंडळी व शिवसैनिक यांना विश्वासात घेऊनच माझी जिल्हा प्रमुखपदी निवड केली आहे; मात्र या निवडीनंतर श्री. उपरकर यांना एवढा पोटशुळ का उठला ? चार वर्षांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश करुन एक शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. पिंगुळी सारख्या नवख्या जिल्हा परिषद मतदार संघात उमेदवारी मिळाली तेथील शिवसैनिक व जनतेने मला स्विकारत निवडुनही दिले आहे. जिल्ह्यात काम करत असताना कुठेही नाराजी दिसली नाही. जिल्हाप्रमुखपदी निवड होताच जिल्हाभरातुन अनेक शिवसैनिक व जनतेचे फोन आले. अन्यायाविरोधात लढणारा, सर्वसामान्यांना न्याय देणारा अशीच सर्वांची माझ्याबद्दल भावना व्यक्त केली. त्यामुळे उपकरांचे मत जाणुन घेण्याची मला जिल्हाप्रमुख म्हणून गरज भासत नाही.''

श्री. उपरकर यांना शिवसेनेत विधान परिषदेचा आमदार बनविले. त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज होऊन ते शिवसेनेतुन बाहेर पडले. त्यांच्यासोबत जे-जे गेले ते परत शिवसेनेत आले असुन आज शिवसेनेत काम करीत आहेत. पक्षप्रमुख ठाकरे यांना अपेक्षीत असलेले काम या जिल्ह्यात सुरू आहे. या पुढेही संघटना अधिक बळकट करण्यासाठी निश्‍चित प्रयत्न केले जातील, असे श्री.पडते यांनी यावेळी सांगितले.

श्री. पडते म्हणाले, ""श्री. उपरकर यांनी माझ्यावर केलेले आरोप धांदात खोटे आहेत. पुर्वी जिल्ह्यात कुठेही काही घटना घडली तर पहिल्या नंबरला संजय पडतेंचे नाव पोलिस ठाण्यात येत असे. तशी परिस्थिती त्यावेळी होती. आता रमेश गोवेकरांचे काय झाले? असे उपरकर विचारत आहेत; मात्र त्यांनीच माझ्याविरूध्द षडयंत्र रचुन या प्रकरणात माझे नाहक नाव गोवण्याचा प्रयत्न केला.''

""आडेलीतील एका व्यक्तिला 15 हजार रूपये देऊन संजय पडतेंचे नाव या प्रकरणात टाकण्याबाबत सांगितले होते; मात्र या प्रकरणाअंतर्गत माझी सीबीआय तसेच दिल्लीत नार्को टेस्टही झाली; पण या चौकशीत निर्दोष सुटलो आहे. त्यामुळे रमेश गोवेकरांचे काय झाले हे जनतेला ज्ञात आहे.''
- संजय पडते,
जिल्हाप्रमुख शिवसेना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg Shivsena District president Sanjay Padte comment