सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! वाचा सविस्तर...

sindhudurg Wetland website in Sindhudurg district
sindhudurg Wetland website in Sindhudurg district

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व असलेल्या जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले. या मोहिमेला अधिक बळ मिळावे, या हेतुने "सिंधुदुर्ग वेटलॅंड' शिर्षकाखाली पर्यावरण प्रेमींनी लोकसहभागातून संकेतस्थळ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच संकेतस्थळ असून त्याचे लॉंचिंग 15 ऑगस्टला सायकांळी 4 वाजता वेटलॅंड समितीचे सदस्य डॉ. अफोज अहमद यांच्या हस्ते होणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. जिल्ह्यातील पाणथळ जागाही त्याचाच एक भाग आहे. पाणथळ ठिकाणाच्या बाजूला पर्यावरणाच्या दृष्टीने असणारी हिरवीगार झाडे, काही ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे याचा पर्यावरण आणि पर्यटनाच्या नजरेतून विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ठिकाणे दुर्लक्षित राहिली. त्यामुळे विविध अंगानी जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात समुद्री किनारी, भरतीमुळे दलदलीचा भाग, कांदळवन, तलाव, नद्यांचे किनारे आणि गवताळ अन्‌ दलदलीची, अशी 373 ठिकाणे आहेत.

याव्यतिरिक्त देखील ठिकाणे असू शकतील. त्यातील इनलॅंड प्रकारात येणाऱ्या 57 पाणथळ जांगाचे सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. यामध्ये मालवण ः 5 कुडाळ : 17, सावंतवाडी : 8, वेंगुर्ले : 9, दोडामार्ग : 2, कणकवली : 11, देवगड : 1, वैभववाडी : 4 इतक्‍या ठिकाणांचा समावेश आहे. वेटलॅंड समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे काम लोकसहभागातून पूर्ण केले. पाणथळ जागा, नैसर्गीक जलस्तोत्राचे संरक्षण व्हावे, त्याचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे आणि नागरिकांनी आपआपल्या परिसरातील अशा जागांचे जतन करावे या हेतूने जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी "सिंधुदुर्ग वेटलॅंड 'अशी जिल्ह्यातील पाणथळ जागांचे संकेतस्थळ तयार केले.

निलेश गावडे, गार्गी शिंगटे, रघुवीरसिंग राठौरे, प्रीतम कुमार, आनंद कुलकर्णी, गणेशसिंग राठौरे या टीमने त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे. देशातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे. याचे उद्‌घाटन 15 ऑगस्टला "सिंधुदुर्ग वेटलॅंड' फेसबुक पेजवर ऑनलाईन होणार आहे. 


दृष्टीक्षेपात 
राज्यात एकूण 21 हजार 668 पाणथळ जागा असून 10 लाख 14 हजार 522 हेक्‍टर क्षेत्र त्याखाली आहे. भौगोलिक क्षेत्राच्या 3.3 टक्के इतके हे क्षेत्र आहे. जलाशयाखाली 36.29 टक्के, तलावखाली 20.57 टक्के, नदी-ओहोळतर्गंत 29.54 टक्के, खाडीखाली 4.10 टक्के तर कांदळवनखाली 2.98 टक्के इतके क्षेत्र आहे. 

"कोकण वेटलॅंड'ची स्थापना 
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने पाणथळ जागा सरक्षण हेतूने कोकण वेटलॅंड मंचची स्थापना करण्यात आली आहे. पाणथळ जागा उल्लघंन संदर्भात लेखी तसेच फोन, इमेलद्‌वारे तक्रार आल्यास तहसिलदार, जिल्हाधिकारी यांनी 48 तासांच्या आत ठिकाणाची पाहणी करून उल्लंघन पुर्वस्थितीत आणण्यासोबत उल्लंघन करणारावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. 

पाणथळ जागांबाबत जागृती नसणे आणि कायद्याचे अज्ञान हे पाणथळ जागा नष्ट होण्यामागची कारणे आहेत; परंतु ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी मार्गी लागण्यासाठी पाणथळ नैसर्गीक स्तोत्रांचे संवर्धन करणे नागरिकांचे मुलभुत कर्तव्य आहे. नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची देखील माहिती घेणे आवश्‍यक आहे. 
- ऍड. ओमकार केणी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले असून हे सर्व्हेक्षण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यापित करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. आता हे सर्व्हेक्षण जिल्ह्यातील लोकांसमोर आणले जात आहे. गावातील सजग नागरिकांनी आपला गाव, आपला परिसर जाणुन घेण्याची गरज आहे. 
- प्रा. हसन खान, सदस्य, सिंधुदुर्ग वेटलॅंड समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com