कोरोना शिरकावानंतरही येथील जिल्हा परिषद सुरुच 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

गणेशोत्सवपूर्वी जिल्हा परिषदमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. शिक्षण विभागातील तीन कर्मचारी बाधित झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी दिली होती. यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांच्यात चर्चा झाली.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस जिल्हा परिषद बंद ठेवण्याची मागणी येथील अधिकारी - कर्मचारी यांच्याकडून होत आहे; मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यासाठी सकारात्मक नाहीत. त्यामुळे अधिकारी - कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंगळवारी (ता. 25) सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदमध्ये येत असून याबाबत अंतिम निर्णय घेवू, असे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी सांगितले. 

गणेशोत्सवपूर्वी जिल्हा परिषदमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. शिक्षण विभागातील तीन कर्मचारी बाधित झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी दिली होती. यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांच्यात चर्चा झाली.

या चर्चेवेळी आणखी कर्मचारी बाधित निघाल्यास जिल्हा परिषद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गणेशोत्सवनिमित्त 21 ते 23 ऑगस्ट अधिकृत सुट्टी होती. पुढील चार दिवस यात वाढ करून 27 ऑगस्टपर्यंत सुट्टी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी सांगितले होते; मात्र तसे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी 20 ऑगस्टला काढले नाहीत.

त्यानंतर जिल्हा परिषदेत आणखी सात रुग्ण मिळाले. यात शिक्षण विभागासह आरोग्य व पशु संवर्धन विभागाचा समावेश आहे. त्यामुळे डॉ. वसेकर कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी आज जिल्हा परिषद पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतील, असे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

डॉ. वसेकर यासाठी तयार नसल्याचे अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एक रुग्ण मिळाल्याने सावंतवाडी तहसीलदार यांनी दोन दिवस तहसील कार्यालय बंद ठेवले. वेंगुर्ले तहसील कार्यालय बंद ठेवले आहे. मग 10 रुग्ण मिळालेले असताना जिल्हा परिषद सुरु का ? कर्मचाऱ्यांच्या जीवापेक्षा प्रशासकीय कामकाज महत्वाचे का ? असा प्रश्‍न अधिकारी-कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. 

बैठकीत घेणार निर्णय 
जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ""गणेशोत्सव पूर्वी झालेल्या बैठकीत सुट्टी देण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे 10 कर्मचारी बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद बंद ठेवून ही साखळी तोडण्याची गरज आहे. डॉ. वसेकर यांनी रुग्ण मिळालेले शिक्षण, आरोग्य व पशु संवर्धन हे तिन्ही विभाग बंद ठेवले आहेत. तरीही पूर्ण जिल्हा परिषद बंद ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे उद्या (ता. 25) आम्ही सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदमध्ये येणार असून यावेळी डॉ. वसेकर यांच्या समवेत बैठक घेतली जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषद बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg Zilla Parishad Work Continues Even After Corona Entry