esakal | Sindhudurga : सापेक्ष आणि अप्राप्य.
sakal

बोलून बातमी शोधा

nature

Sindhudurga : सापेक्ष आणि अप्राप्य.

sakal_logo
By
- सुनील जोशी

पाऊस आणि सजीव, निर्जीव यांचे नाते अतूट आहे. सजीवांना पाण्याच्या रौद्र रूपाचा फटका नेहमीच सोसावा लागत आहे. दगड, खडक, त्यातील कपारी निर्जीव; मात्र त्यात पावसाचे पाणी साठले, की त्याला रूप येते चैतन्याचे आणि सजीवतेचे.

नदी, ओढा, ओहोळ, झरा यांनी ज्यांचं बालपण चैतन्यदायी केलं ते आयुष्यात कधीच मागे रहात नाहीत. कारण सतत चालण्याची, पुढे जाण्याची, प्रेरणा त्यांनी घेतलेली असते ती अक्षय ऊर्जेच्या स्वरूपात. ते सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करीत ध्येय निश्चित गाठतात. हे घडलं किंवा घडतं ते पाण्याशी झालेल्या चैतन्यरूप मैत्रीने. अनेक यशस्वी उद्योजक किंवा जीवनात आपले आनंदरूप इत्सिप्त साध्य करणाऱ्या लोकांशी हृदयस्थ बातचीत करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी मनोमन मान्य केलं की आम्हाला जलस्रोतांचं माहात्म्य माहीत नाही; परंतु त्यांनी आम्हाला त्यांनी भरभरून दिलं.

पाणवठा आणि त्याच्या अवतीभोवती निर्माण झालेली संस्कृती समृद्ध असते असं म्हणतात ते त्यामुळंच. अनेक संतांनी पाण्यावरचं प्रेम वेळोवेळी व्यक्त केलेलं आहेच. रामदास स्वामींच्या लेखनात अनेक ठिकाणी दिसतं.

वळणें वांकाणें भोवरे । उकळ्या तरंग झरे ।

लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं ।।

शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।

चिपळ्या चळक्या भळाळ । चपळ पाणी ।।

फेण फुगे हेलावे । सैरावैरा उदक धावे ।

थेंब फुई मोजावे । अणुरेणु किती ।।

हे शब्द नाहीत तर अंतःस्फूर्त ऊर्जा आहे.. अक्षय ऊर्जा. पाण्यातील सुंदरता विलोभनीय आहेच, त्याच्या जोडीला कोणातही सहज मिसळून जाण्याचा गुणधर्मही महत्त्वाचा. त्याचं वर्णनही रामदास स्वामींनी केले आहे. रामदास स्वामींना निसर्गत: वाहतं पाणी म्हणजे नदी ही मायेसमान भासते. वाहत्या पाण्याचं रूप कोणास कळत नाही, तसंच मायेचंही आहे. मायादेखील पाण्याप्रमाणं चंचल आहे. वाहतं पाणी सुंदर असतं, सुंदर भासतं म्हणून ते केवळ वाहतच राहावं व समुद्राला जाऊन मिळावं असं न वाटता, हे पाणी पृथ्वीच्या गर्भापर्यंत जायला हवं.

याच पाण्याने आता रौद्र रूप धारण केलं आहे हे आपण पाहात आहोत. गेल्या वीसेक वर्षांत निसर्गचक्र पूर्णपणे बदलत चाललंय, मात्र करायचं काय हेच समजत नाहीये, अशी स्थिती झाली आहे सर्वसामान्य लोकांची. निसर्गचक्र बदलत चालल्याने होत्याचे नव्हते होत आहे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य कष्टकरी माणसाचे. सुगी काढून खळ्यात ठेवलीय आणि फक्त दारापर्यंत, घरात पोचवायचे शिल्लक, मात्र अनपेक्षित आलेला बेफाम आणि बेभान पाऊस तोंडचा घास घेऊन जातो, तेव्हा त्यास काय म्हणायचे?

ज्या पाण्यास अक्षय ऊर्जेच्या रूपात आपण पाहतो तीच काळरूप घेते.. हे का होत आहे? पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे तारक आणि मारक रूप आहे. दोन्ही रूपं स्वीकारून आपली वाटचाल ठरवलेली आहे, निसर्गाने..ती टाकता येत नाही अन् टाळताही.

कोणतीही ऊर्जा ही संपत नाही कधीही, ती रूपांतरित होते, तरच तिचे अस्तित्व टिकून राहते. पाण्याची रूपं बदलतात, परंतु नष्ट होत नाहीत. पाणी नसणे म्हणजे शेवट. चराचराचा आणि ते असणे, गरजेनुसार मिळणे म्हणजे जगाचे रहाटगाडगे सुरू आहे, इतकंच.

येणारा पर्यावरणीय काळ कठीण आहेच; परंतु त्याचा मुकाबला केलाच पाहिजे. आपल्या देशात भूजलाचा वापर अनिर्बंध आहे. त्यामुळं निर्माण झालेली संकटे ही मोठी आहेत. युनोस्कोने २०२२ हे वर्ष भूजल सरंक्षण वर्ष म्हणून जाहीर करताना भूजलाचा काळजीपूर्वक वापर व्हावा याकडे लक्ष वेधले आहे.

जागतिक बँकेने भूजलाचा वाढता वापर लक्षात घेत भूजल संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले आहे. भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्या आर्थिक सहयोगाने अटल भूजल योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेत देशातील सात राज्ये आहेत त्यात महाराष्ट्रही आहे. आपल्या राज्यातील १३ जिल्ह्यातून १४४३ गावे या योजनेत समाविष्ट आहेत. आता कसोटी आहे ती पाण्याकडे अक्षय ऊर्जा म्हणून पहायचे की फक्त पाणी म्हणून..निसर्गाचे वरदान. फुकट मिळणारे....

(लेखक समग्र नदी परिवाराचे अध्यक्ष आहेत.)

loading image
go to top