त्या’ कृषी पर्यवेक्षकावर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

Sindhudurga : ‘त्या’ कृषी पर्यवेक्षकावर कारवाई करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : येथील कृषी कार्यालयातील महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई केली जावी, अन्यथा त्या अधिकाऱ्याला तालुक्यात थारा देणार नाही. यापुढे तालुक्यात महिलांच्या बाबतीत असे होणारे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शिष्टमंडळाने दिला.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसूळे यांना मनसेच्यावतीने आज निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्याची याप्रकरणी चौकशी सुरू असून तो अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी कृषी अधिकारी अडसूळे यांनी दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात धडक दिली. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेना परिवहन जिल्हाध्यक्ष अॅड. राजू कासकर, संतोष भैरवकर, लक्ष्मीकांत हरमलकर, मंगेश वरक आदी उपस्थित होते

श्री. सुभेदार म्हणाले, ‘कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्याकडून तालुक्यातील कृषी सहाय्यक महिलांच्या बाबतीत असभ्य वर्तन केले जात आहे. यापूर्वीही त्यांनी विविध ठिकाणी कार्यरत असताना असेच प्रताप केले आहेत. त्याची पुनरावृत्ती आता सावंतवाडीत झाली आहे. अशा अधिकाऱ्याला यापुढे तालुक्यात थारा देणार नाही. त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जावी, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल.’ अॅड. कासकर यांनी तो अधिकारी यापुढे तालुक्यात येता कामा नये, याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्या अधिकाऱ्याच्या अगोदरच्या घटना पाहिल्या असता अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अडसूळे यांनी रजेवरून आल्यानंतर प्रथम या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. त्यानंतर महिलांना बोलावून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आम्हाला काम करायचे नाही, त्यांची बदली केली जावी, अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले असून या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे.

प्रशासकीय कार्यवाहीला थोडा विलंब होईल; मात्र तोपर्यंत त्या अधिकाऱ्याला ओरोस जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात बदलीने पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता महिलांची काही तक्रार राहिलेली नाही; परंतु जी काही तक्रार झाली आहे, त्या अनुषगाने चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिलांचे जबाब घेतले आहेत. त्या कृषी पर्यवेक्षकाची ऑर्डर झालेली आहे. तरी या प्रकरणाची जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्यांना ओरोस जिल्हा कृषी कार्यालयातच ठेवले जाणार आहे. त्यांच्यावर निश्चित कारवाई केली केली जाईल. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर निलंबनाची तसेच बदलीची कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकारी अडसूळे यांनी दिले.

loading image
go to top