सिंधुदुर्ग : ‘तिलारी पाटबंधारे’ विरोधात उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपोषण

सिंधुदुर्ग : ‘तिलारी पाटबंधारे’ विरोधात उपोषण

सिंधुदुर्ग : तिलारी पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कामामुळे आपल्या शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले. स्वतःची जमीन असताना आज माझ्यावर खंडाची शेती करण्याची वेळ तिलारी पाटबंधारे विभागाने आणली आहे, असे सांगत शेतकरी राजू माधव यांनी आपला रोष अधिकाऱ्यांवर व्यक्त केला. अखेर ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते श्री. माधव यांना मागण्यांप्रमाणे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करत असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण छेडणार असल्याचे माधव यांनी सांगितले.

महाराष्ट्रदिनी राजू माधव यांनी पाडलोस येथे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी पाडलोस सहकारी सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, भाजप सातार्डा शक्ती केंद्र प्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव, शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, ग्रामस्थ विठू गावडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पाडलोस-रोणापाल भागातून जाणाऱ्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पालगत असलेली शेतजमीन अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी कालव्यात कोसळली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत संरक्षक भिंत बांधण्याचे ठोस आश्वासन देत नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगितले होते. त्याला अधिकारी जागले नसल्याने आम्हाला उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागला असल्याचे माधव यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना तात्या माधव यांनी जाब विचारला असता अतिवृष्टीमुळे जमीन वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले; मात्र ही जमीन अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्य कामामुळे वाहून गेल्याचे तात्या माधव म्हणाले. पाऊस दरवर्षी होतो जमीन कधीही वाहून गेली नाही आणि कालव्याचे काम सुरू झाल्यावरच जमीन वाहून कशी जाते असे खडे बोल तात्या माधव यांनी श्री. कोरे यांना सुनावले.

भरपाई देण्याची ग्वाही

दरम्यान, शेतजमिनीचे झालेले नुकसान भरपाई देत संरक्षक भिंत बांधून देणार असल्याचे लेखी आश्वासन कनिष्ठ अभियंता महेंद्र डांबरेकर यांनी दिल्याने पाडलोस येथील शेतकरी माधव यांनी लाक्षणिक उपोषण तूर्त स्थगित केले. यावेळी ठेकेदार विरेश कित्ती उपस्थित होते.

Web Title: Sindhudurgfasting Against Tilari Irrigation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top