esakal | हापूसने केली कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

हापूसने केली कोंडी

यंदाच्या हापूस आंबा हंगामाची अखेर सांगता झाली. अडचणींचा सामना करीत हंगाम संपला. केव्हाही कोसळणाऱ्या पावसाच्या भीतीने उरलासुरला आंबा झाडावरून खाली उतरवण्याची धांदल सुरू आहे. अखेरच्या टप्प्यात सध्या कॅनिंग व्यवसाय जोरात असला तरी त्याला अपेक्षित दर नाही. हापूसला निसर्गाबरोबरच दरानेही फटकारल्याने बागायतदारांची कोंडी झाली.

हापूसने केली कोंडी

sakal_logo
By
संतोष कुळकर्णी

यंदा आंबा हंगामाला प्रारंभापासूनच निसर्गाचा फटका बसला. अवकाळी पाऊस, वादळसदृश स्थिती, हवामानातील चढउतार, कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापनावरील वाढता खर्च यांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली. उत्पन्नापेक्षा उत्पादनावरील खर्च वाढल्याने बागायतदार अडचणीत सापडले. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यानंतर थंडीमध्ये झाडांवर मोहोर दिसू लागल्याने बागायतदारांनी फवारणी सुरू झाली; मात्र अरबी समुद्रात ‘ओखी’ नावाचे वादळ उठल्याने त्याचे परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात जाणवले. समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीमुळे किनारपट्टीवरील वातावरणच बदलले.

जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याने जोर धरला. त्यामुळे बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले. प्रारंभी केलेली फवारणी वाया जाण्याची वेळ बागायतदारांवर आली.

‘ओखी वादळामुळे आंबा कलमांना आलेला मोहोर काळा पडून पहिल्या टप्प्यातील जादा दर मिळवून देणारा आंबा अडचणीत आला. झाडावरील फुललेला मोहोर काळा पडण्याबरोबरच बारीक कणीचे नुकसान झाले. सुरुवातीला येणारा आंबा बागायतदारांना जादा दर मिळवून देतो; मात्र हंगामातील पहिल्या टप्प्यातील आंबा अडचणीत सापडल्याने हापूसचे ‘कॅश’ पीकच बागायतदाराच्या हातून निसटल्यासारखे झाले. त्यातूनही सावरत हंगामाची खडतर सुरुवात झाली. उत्पादन घटल्याने प्रक्रिया उद्योगाला आंबा मिळेल की नाही अशी शक्‍यता दिसू लागली. पर्यायाने प्रक्रिया उद्योग अडचणीत येण्याबरोबरच पूरक व्यवसायही कोलमडले.

यंदाचा आंबा हंगाम बागायतदारांच्या दृष्टीने फारच अडचणीचा ठरला. यंदा तुलनेत आंबा कमी झाला. पहिल्या टप्प्यातील आंबा पीक हवामानामुळे हातून निसटले. उत्पादन घटल्याने बाजारातील दर स्थिर राहतील असे वाटत होते आणि प्रारंभी ते राहिलेही; पण हंगाम मध्यावर असतानाच दर कोसळले आणि बागायतदारांसमोर संकट उभे राहिले. कॅनिंगचा दरही खाली आल्याने बागायतदारांची कोंडी झाली. 
- माधव (नाना) साटम, 

  आंबा बागायतदार, शिरगाव

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ४० टक्‍केच आंबा फळबाजारात विक्रीला आला. आवक कमी राहिल्याने गतवर्षीच्या तुलनेत दर जास्त राहिले. काही आंबा फळे गुणवत्तेमध्ये काहीशी कमी होती. कोकणबरोबरच अन्य राज्यातील आंबाही तुलनेत कमी आला. आता कोकणातील आंबा फळबाजारात येण्याचे बंद झाले असले तरी गुजरात, कर्नाटक येथील आंबा बाजारात येत आहे.
- संजय पानसरे, 

   आंबा व्यापारी, वाशी फळबाजार

यंदा अंदाजे ६० टक्‍केच आंबा प्रक्रिया उद्योगाकडे वळला. 
आंबा उत्पादन कमी असूनही अपेक्षित दर मिळाला नाही. धारवाड (कनार्टक) येथील आंबा प्रक्रिया उद्योगासाठी कंपन्यांनी आणल्याने स्थानिक आंब्याचे भाव पडले. प्रक्रिया कंपन्यांकडून सुरुवातीला कॅनिंगला दर मिळाला तरी नंतर दर खूपच खाली आल्याने बागायतदारांची निराशा झाली.
- मंगेश वेतकर, 

 
 कॅनिंग व्यावसायिक

loading image