श्रीमंतांना फायदा, सामान्यांचा तोटा ; आंबा बागायतदार कोलमडला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

आंबा विकला जाईना, जो काही विकला जात होता. त्याला अत्यल्प किंमत मिळत होती.

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वसामान्य आंबा उत्पादक विशेषत: ग्रामीण भागातील व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती गेली दहा वर्षे फारच गंभीर होत आहे. पिककर्जाची परतफेड करताना कर्जदारांना रक्कमेची जमवाजमव करून पिककर्ज नवीन-जुने करून घ्यावे लागते. कर्जदाराच्या हातात काहीच राहात नाही. कोरोनाच्या टाळेबंदीचा श्रीमंत बागायतदारांना फटका बसला नसला तरीही सामान्य बागायतदार कोलमडला आहे. त्यांना शासनाकडून दिलासा मिळाला पाहिजे, अशी मागणी आंबा बागातयदार टी. एस. घवाळी यांनी केली.

हेही वाचा -  सिंधुदुर्ग किल्ला पर्यटनासाठी खुला ; होडीची वाहतुक सुरु -

ऐन आंबा तोडणीचा हंगाम सुरू होताच कोरोनाचे संकट आले. महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर झाले. आंबा विकला जाईना, जो काही विकला जात होता. त्याला अत्यल्प किंमत मिळत होती. २०१४-१५ च्या हंगामात फेब्रुवारी-मार्चच्या सुरवातीला अवकाळी पाऊस झाला. त्याचा महसूल सर्वे होऊन तत्कालीन फडणवीस सरकारने तीन महिन्याचे पीक कर्जावरील व्याज माफ केले. कर्ज पुनर्गठनाची सुविधा देऊन त्यावरील व्याजही माफ करण्याचा शासन निर्णय काढला.

८० टक्के व्यावसायिकांना त्याचा अजूनही लाभ मिळालेला नाही. आंबा व्यावसायिकांच्या अडीअडचणीकडे दुर्लक्ष होत आहे. २०२० च्या हंगामात कोरोनाच्या संकटातील लॉकडाउनमुळे सर्वसामान्य तळागाळातील व्यावसायिक कुटुंब चालविण्यासाठी व्यवसाय करतात, असे आंबा व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत आहेत.

हेही वाचा - जयंत पाटलांनी घेतली फिरकी ; तालुकाध्यक्षच झाले क्‍लीन बोल्ड -

"उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा कानावर घातल्या आहेत. त्या वेळी सामंत यांनी शासनाकडून काही आर्थिक मदतीची अपेक्षा करू नका; मात्र व्यवसाय उभा राहण्यासाठी बॅंकांकडून दीर्घकाळ आधार घेता येईल का? याबाबत जिल्हाधिकारी, बॅंकांचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिले."

- टी. एस. घवाळी, आंबा उत्पादक

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: situation of mango horticulturalist are in critical situation in konkan