मिरकरवाड्यातील सहा बर्फ कारखाने बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

एक नजर

  • रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासनाचा मिरकरवाड्यातील सहा बर्फ कारखानदारांना दणका.
  • कोणताही परवाना न घेता बर्फाचा मासळी टिकविण्यासाठी वापर
  • बर्फ खाद्याशी संबंधित असल्याने अन्न व औषध प्रशासनाचा परवाना अनिवार्य
  • अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे सहा बर्फ कारखाने बंद करण्याचे अन्न प्रशासनाचे आदेश. 

रत्नागिरी - येथील अन्न व औषध प्रशासनाने मिरकरवाड्यातील सहा बर्फ कारखानदारांना दणका दिला. कोणताही परवाना न घेता बर्फ मासळी टिकविण्यासाठी वापरला जात होता. बर्फ खाद्याशी संबंधित असल्याने अन्न व औषध प्रशासनाचा परवाना अनिवार्य आहे; मात्र त्याला फाटा दिल्यामुळे, तसेच अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे अन्न प्रशासनाने सहा बर्फ कारखाने बंद करण्याचे आदेश दिले.   

कोकण मरीन प्रोडक्‍ट, एच. डी. नाईक आईस फॅक्‍टरी, क्‍लिंटन आईस, अलफला आईस फॅक्‍टरी आदी बर्फ कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवस ही कारवाई सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती मिळाली होती. मासळी टिकविण्यासाठी जो बर्फ वापरला जातो, त्याचा थेट खाद्याशी संबंध येतो. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे.

तपासणीमध्ये ही बाब पुढे आली की या बर्फ कारखान्यांकडे कोणताही परवाना नाही. आम्ही बर्फ खाण्यासाठी वापरत नाही, तर तो मसाळी टिकविण्यासाठी वापरतो, अशी पळवाट काही कारखानदारांनी काढली होती. परंतु मासळी हा खाद्यपदार्थ आहे. ती टिकून राहावी यासाठी बर्फचा वापर होतो. म्हणजे थेट खाद्याशी संबंधित विषय आला.

मासळी व्यवसायावर परिणाम
मासेमारीचा हंगाम असल्याने मच्छीमारांना मासळी टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ लागतो. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून सहा बर्फ कारखाने बंद केल्याने मच्छीमारांची मोठी अडचण झाली आहे. काही मच्छीमारांनी या संदर्भात सहायक आयुक्त हस्मी यांच्याशी चर्चा केली. परंतु एकाही बर्फ कारखानदाराकडे कोणतीही कागदपत्र नसल्याने प्रशासनाला सवलत देता आली नाही. याचा मासळी व्यवसायावर चांगलाच परिणाम होणार असल्याचे दिसते.मासळीसाठी तो बर्फ वापरला जात असेल तर कारखान्यांनी त्याचा परवाना घेणे बंधनकारक होते. मात्र कोणाकडेही परवाने सापडले नाहीत. तसेच बर्फ बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये अस्वच्छता दिसली. म्हणून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये सहा कारखाने बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सय्यद इम्राहन हस्मी यांनी दिली. त्यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकर प्रशांत गुंजा, दशरथ बांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six ice factories closed at Mirarkarwada