मच्छीमारही होणार आता स्मार्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

पाण्यात खराब होऊ न शकणारे पॅनकार्डसारखे आधारकार्ड मच्छीमारांना मत्स्य विभागाकडून वितरित केले जात आहे.

मालवण (रत्नागिरी) : समुद्रात मासेमारीला जाताना ओळखपत्र म्हणून मूळ आधारकार्डचा वापर आधारकार्ड खराब होण्यास कारणीभूत ठरू शकतो, ही समस्या विचारात घेऊन पाण्यात खराब होऊ न शकणारे पॅनकार्डसारखे आधारकार्ड मच्छीमारांना मत्स्य विभागाकडून वितरित केले जात आहे.

ज्या मच्छीमारांना हे आधारकार्ड प्राप्त झाले आहे, त्यांनी त्या आधारकार्डचा काळजीपूर्वक वापर करावा आणि ज्या मच्छीमारांनी अशा प्रकारच्या आधारकार्ड अपडेशनसाठी प्रस्ताव दिले नसतील, त्यांनी त्वरित मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे. आधारकार्ड अपडेशन हा मुद्दा देशाच्या सागरी सुरक्षिततेशी निगडीत आहे. त्यामुळे त्याला प्रथम प्राधान्य द्यावे. ज्या मच्छीमारांनी अद्यापही आधार ओळखपत्र अपडेशन केलेले नाही, त्यांनी ते लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे. कारण मच्छीमारांनी आधार ओळखपत्र अपडेशन न करणे ही बाब देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरू शकते. 

हेही वाचा - सायंकाळी पती व मुलांसह कार मधून रत्नागिरीतून कणकवलीकडे निघाल्या होत्या

 

जे मच्छीमार सहकारी संस्थेचे सभासद नाहीत; परंतु मच्छीमार नौकेवर खलाशी किंवा अन्य कर्मचारी म्हणून काम करतात, अशा खलाशांचीसुद्धा आधारकार्ड अपडेशन करण्याबाबत मत्स्य विभागाकडून कार्यवाही आवश्‍यक आहे. ही कार्यवाही करत असताना ज्या खलाशी वर्गाची पोलिस विभागामार्फत तपासणी करणे आवश्‍यक आहे. त्यांची रितसर तपासणी करून ही कार्यवाही करण्यात यावी, असे मत्स्य विभागाने म्हटले आहे. 

मत्स्य विभागाच्या काही सूचना 

नौकानयन करणारे तांडेल आणि उपतांडेल यांनी जलपरिवहन विभागामार्फत प्रशिक्षण घेतले असल्याचे तसेच ते नौका समुद्रात चालवण्यासाठी सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य करावे. त्यांचे तांडेल म्हणून आधारकार्ड अपडेशन करावे. मच्छीमार जेव्हा जेव्हा समुद्रात मासेमारीसाठी जातील, तेव्हा त्यांच्याकडे अपडेशन केलेल्या आधारकार्डची एक प्रत सोबत नौकेवर ठेवणे बंधनकारक राहील, असे मत्स्य विभागाने म्हटले आहे.  

हेही वाचा -  विनायक राउतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का? 

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smart aadhaar card given to fishermen for fishing department in ratnagiri