मांडूळच्या तस्करीत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त ; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

मांडूळ विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

रत्नागिरी : ‘ब्लॅक मॅजिक’साठी वापरण्यात येणाऱ्या मांडूळची तस्करी करणाऱ्या सांगली, सातारा जिल्ह्यांतील तिघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बावनदीजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश युवराज मंडले (वय २५, रा. वाकुर्डे, ता. शिराळ, जि. सांगली), सुरेश सुनील भोसले (२९, रा. शिवडे, ता. कऱ्हाड), महादेव गोरख लोंढे (३९, रा. कोपर्डी, हवेली, ता. कऱ्हाड, जि. सातारा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. वन्यजीवांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा ते संगमेश्‍वर दरम्यान सापळा रचला. मांडूळ घेऊन येणाऱ्या वाहनावर पोलिसांची बारकाईने नजर होती.

हेही वाचा - वैद्यकीय अधिकाऱ्यांना कणकवलीत घेराओ
 

निवळी- बावनदी येथील बसस्टॉपवर एक मोटार संशयितरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या वाहनाची तपासणी करण्यात आली. गाडीमध्ये तिघेजण होते. त्यांची झडती घेतली असता मांडूळ सापडला. पोलिसांनी पुढील तपासणीसाठी पाली येथील वनपाल गौतम कांबळे यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. वनविभागाकडून ते मांडूळ असल्याचे सांगितले. मांडूळ विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मांडुळासह गाडी (एमए-५०-ए-०४५०) असा १५ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कामगिरी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली. एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, हेडकॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, नितीन डोमणे, अरुण चाळके, पोलिस नाईक बाळू पालकर, अमोल भोसले, विजय आंबेकर, उत्तम सासवे, सत्यजित दरेकर, प्रवीण खांबे, गुरुप्रसाद महाडिक, चालक दत्तात्रय कांबळे यांनी कारवाई केली.

हेही वाचा -  मालवण किल्ला मंदिराची पाहणी

सहा महिन्यांतील दुसरा प्रकार

मांडूळचा वापर ब्लॅक मॅजिकसाठी केला जातो. विशिष्ट जाडीच्या आणि लांबीच्या मांडुळाला मोठी मागणी असते. रत्नागिरीत अशा प्रकारची विक्री करण्यासाठी आलेल्यांवर कारवाई केल्याचा हा गेल्या सहा महिन्यांतील दुसरा प्रकार आहे. यापूर्वी काजरघाटी येथे कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ताब्यात घेतलेले संशयित हे स्थानिक होते.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smuggling of mandul three people arrested in ratnagiri 15 lakh rupees forfeit in ratnagiri