आता बिबट्याचा शहरामध्येही वावर ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

दिवटेवाडी आणि लगतच्या रानतळे परिसरात बिबट्याचा मुक्तपणे वावर असल्याचे लोकांकडून सांगितले जात आहे

राजापूर : बिबट्याच्या मुक्त वावरामुळे तालुक्याचा ग्रामीण भाग दहशतीखाली असताना आता बिबट्याचा शहरांमध्येही वावर वाढला आहे. दिवटेवाडी परिसरामध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याने गाय मारल्याची घटना काल ( ता.2) घडली आहे. त्यामळे शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 जंगलतोडीमुळे बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने जंगली श्वापदांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. त्यामध्ये बिबट्यांचे मानवी वस्तीत शिरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातून भक्ष्य मिळविण्याच्या उद्देशाने पाळीव प्राण्यांसह माणसांवर बिबट्याचा हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेकदा बिबटे आढळून आले आहेत. त्यामध्ये धोपेश्वर, आडिवरे परिसरामध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याचे दर्शन लोकांना झाले आहे. त्यातून रात्रीच्यावेळी दुचाकीस्वार गाड्या चालविताना घाबरत आहेत. तर, शेतकरी दिवसा जंगलामध्ये गुरे चरायला पाठविण्यास धजावत आहेत. त्यातून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. आता तर शहरात बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने एकच घबराट पसरली आहे.  

शहरातील दिवटेवाडीत गजबजलेल्या वस्तीत बिबट्याचा संचार सुरू असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. 

दिवटेवाडी आणि लगतच्या रानतळे परिसरात बिबट्याचा मुक्तपणे वावर असल्याचे लोकांकडून सांगितले जात आहे. अशातच बिबट्याने काल दिवटेवाडी येथील एका गायीची शिकार केली आहे. रामचंद्र उर्प आप्पा शिंदे यांनी काल सकाळी गुरे चरण्यासाठी सोडल्यानंतर सायंकाळपर्यंत एक गाय परत आली नाही. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली असता घरापासून काही अंतरावरील जंगलात गाय मृतावस्थेत आढळून आली.  

हे पण वाचा - रत्नागिरी तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवी बोट ; घुसखोरी, तस्करी रोखणार

 

बिबट्याने हल्ला करून गायीला ठार केल्याचे आढळून आले. तसेच बिबट्याने गायीला ओढत गुहेपर्यंत नेल्याचेही दिसत होते. याबाबत वनविभागाला खबर मिळताच वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बिबट्याच्या वास्तव्यामुळे दिवटेवाडी परिसरात घबराट पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snow leopards roam in raipur city