..तर राजकीय संघर्षाला तयार रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

..तर राजकीय संघर्षाला तयार रहा

सावंतवाडी : न्यायालयाने केलेल्या पाणउताऱ्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे पॉझिटिव्ह भूमिकेत दिसत आहेत; मात्र १७ तारीखच्या न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी आपली भुमिका नाही बदलल्यास कोकणाच्या शांततेसाठी आणि विकासासाठी राजकीय संघर्षाला तयार आहे, असा इशारा माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. या आधीचा राजकीय संघर्ष रक्तरंजित किंवा मारामारी नव्हता. मी माझ्या मार्गाने जात मतपेटीतून राणेंना हरवले; मात्र पुन्हा एकदा संघर्ष करावा लागल्यास तो शांततापूर्ण असणार आहे. आणि जनता माझ्या सोबत राहील, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला. आमदार केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर टीका केली. यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश रावत, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार उपस्थित होते. (Konkan News)

हेही वाचा: शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई

श्री. केसरकर म्हणाले, ``केंद्रीय मंत्री राणे यांची सुरू असलेली जन आशीर्वाद यात्रेला आपला विरोध नाही; मात्र कोरोनासारख्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असतानाही यात्रेला गर्दी जमवणे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसून धोकादायक आहे. ठाकरे कुटुंबावर बोट उगारल्यास महाराष्ट्र पेटेल हे सांगायला नको; मात्र मुख्यमंत्र्यावर भडक विधाने करायची आणि महाराष्ट्रात अशांतचा निर्माण करायची, त्यातून आपला फायदा करून घ्यायचा, हा यामागचा राणे यांचा डाव होता का? अशी विधाने केल्यास शिवसैनिक गप्प बसणार का? त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्याचा विचार त्यांनी आधी करायला हवा होता. असे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची राजकीय संघर्ष हा केलाच पाहिजे. तुम्ही कोणालाही उभा कराल आणि कोकणची शांतता भंग कराल हे चुकीचे आहे. हे घडवून आणणारे कोण? आणि यामागे कोणाचे डोके असेल हे माहीत नाही; परंतु आम्ही कोकणी आहोत आमच्याकडे येऊन अशांतता का करता, तुम्हाला पूर्ण देश पडलेला आहे. तेथे जाऊन काय ते करा.``

श्री. केसरकर म्हणाले, ``राणे यांना झालेली अटक ही कायद्याला धरूनच होती. कायद्यात नसती तर न्यायालयाने ती मान्य केली नसती. त्यामुळे कोर्टाने त्यांना दिलेली चपराक हे बोलके उदाहरण आहे. आज त्यांच्या भाषणातून दिसणारी पॉझिटिव्ह भूमिका हे त्याचेच उदाहरण आहे. भडक भाषणे होता कामा नये, अशी अट घालवलास त्यांना जामीन झालेला आहे. उद्या कोर्टासमोर त्यांना आपले म्हणणे मांडावे लागेल. त्यामुळे उगाच माझा विजय झाला, असे बाहेर सांगणे चुकीचे ठरेल.`

हेही वाचा: देवमाशाला होते चार पाय; काय आहे हे नवं संशोधन?

राणेंनी १७ तारखेनंतर आपल्या भूमिकेत बदल न केल्यास मी पुन्हा एकदा कोकणची शांतता अबाधित राहण्यासाठी आणि विकासासाठी संघर्षाला तयार आहे; मात्र हा संघर्ष करायला भाग पडल्यास तो संघर्ष शांततेचा असणार आहे. आमदार नितेश राणे यांनीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तसेच ईडीची भाषा केली होती; मात्र मी कधीही चौकशीला तयार आहे. निरपराध माणसाला ईडी काय करू शकत नाही; पण तुमच्या किती केसेस आहेत हे मी जाहीरपणे काढेल. जे माझ्यावर बोट दाखवतात, त्यांना काय उत्तर द्यायचं एवढी नीतिमत्ता माझ्याकडे आहे आणि ती नीतिमत्ता असल्यानेच मी या पूर्वीची लढाई राणे विरोधात करू शकलो, असेही श्री. केसरकर म्हणाले.

हेही वाचा: "PMRDAच्या पायाभूत सुविधांचं महापालिकेकडं होणार हस्तांतरण"

मग चौकशीची मागणी का?

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्याएवढे ते तुम्हाला थोर वाटत होते तर त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशीची मागणी का केली होती? त्यामुळे नीतिमत्तेच्या गोष्टी करू नका. जिवंतपणी त्रास द्यायचा व मरणानंतर अशी नाटके करायची याला आपला विरोधच असेल, असेही केसरकर यांनी बोलताना सांगितले.

Web Title: So Be Ready For Political Struggle

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top