esakal | नक्षीदार मातीच्या रंगीत पणत्यांना अच्छे दिन 
sakal

बोलून बातमी शोधा

Soil Made Colored Lamps Gets Good Market Due To Ban on China Product

मातीच्या वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तुळस (ता. वेंगुर्ले) येथून जिल्ह्यातील अन्य बाजारपेठेत पणत्या विक्रीस उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील मातीतून कलाकुसरीच्या वस्तू घडविणाऱ्या कुंभार कारागीरांना सुगीचे दिवस आले आहेत. 

नक्षीदार मातीच्या रंगीत पणत्यांना अच्छे दिन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - यंदा बाजारामध्ये मेड इन चायनाच्या पणत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बाजारामध्ये मातीतून घडविणाऱ्या पणत्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. मातीच्या तपकिरी रंगासह विविध अन्य रंगसंगतीत नक्षीदार पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षक रंगसंगतीनुसार पणत्यांची किंमत आकारली जात आहे.

मातीच्या वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तुळस (ता. वेंगुर्ले) येथून जिल्ह्यातील अन्य बाजारपेठेत पणत्या विक्रीस उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील मातीतून कलाकुसरीच्या वस्तू घडविणाऱ्या कुंभार कारागीरांना सुगीचे दिवस आले आहेत. 

दिवाळीचे वेध नागरिकांना लागले आहेत. मार्चपासून ऑक्‍टोबरपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने यादरम्यान आलेले गणेशोत्सव तसेच इतर काळामध्ये चाकरमानी, व्यापाऱ्यांच्या, जिल्ह्यातील बऱ्याच नागरिकांच्या पदरी निराशा दिसून येऊ लागली होती. दसरा येईपर्यंत काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व्यापार व उद्योगांना चांगली चालना मिळू लागली.

आता दिवाळी येऊन ठेपल्यामुळे व्यापार व्यवसायात झालेला तोटा भरून काढण्यासाठी व्यापारी आर्थिक उलाढाल चांगली होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; पण कोरोनामुळे चिनी वस्तूंवर बंदी आणल्याने त्याचा व्यापारावर परिणाम दिसून आला. ऑगस्टनंतर मेड इन चायनाच्या वस्तूंना याचा फटका बसल्याने यंदा दिवाळीतही आयात-निर्यात धोरणावरही परिणाम दिसून आला.

दरवर्षी दिवाळीत मेड इन चायनाच्या विविध चिनी मातीच्या आकर्षक पणत्या बाजारपेठेत मोठ्या संख्येने दाखल होतात; मात्र यंदा चायना वस्तूंची निर्यात अल्प असल्याने छोट्या शहरापर्यंत चायनाच्या वस्तू यात पणत्यासह, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, तोरणे, इतर सजावटीच्या वस्तू यांचे प्रमाण खूपच कमी असलेले दिसून आले. यात विशेष म्हणजे याचा फायदा भारतीय बनावटीच्या वस्तूंसह स्थानिक व्यापाऱ्यांना त्यांच्या मालाचा खप वाढण्यासाठी झाला.

जिल्ह्याचा विचार केला असता यंदा कुंभार कलाकारांची कमी होत असलेली मातीतील वेगळी कला पुन्हा एकदा जिवंत होऊ लागली आहे. औद्योगिक विकास होण्यापूर्वी स्थानिक व भारतीय बाजारपेठअंतर्गत आयात-निर्यात धोरण राबवण्यावर भर देण्यात यायचा. आता पुन्हा एकदा स्थानिक मातीतील कलाकारांना दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या दिवाळीच्या विविध आकर्षक मातीतील मूर्ती कामातून घडवलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली आहे. यामध्ये मातीतून घडविण्यात येणाऱ्या पणत्यांना मोठी मागणी होत आहे. 

तुळस-वेंगुर्ले हे गाव मातीच्या वस्तूसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे मातीचे कलाकार पुन्हा एकदा व्यवसायाला चालना देत असून दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात पणत्या व इतर मातीच्या वस्तू घडविताना दिसून येत आहेत. येथील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मेड इन चायना वस्तूंकडे पाठ फिरवली आहे. मातीतूनच घडविलेल्या विविध रंगसंगतीत व नक्षीदार असलेल्या पणत्यांसह इतर वस्तू मोठ्या प्रमाणात ते खरेदी करत आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये पणत्या खरेदीसाठी तरुणी व महिला वर्ग खरेदीसाठी दाखल होत आहेत. 

loading image