काही सुखद ! मनोरंजनात्मक गेम्सआधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

पॉवर पॉइंटचा उपयोग करून विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक गेम्स तयार केले. त्या गेम्सआधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला. 

रत्नागिरी - शाळेला सध्याच्या काळात मिळालेल्या दीर्घ सुट्टीत विद्यार्थी जागरूक राहावा, त्याला शिकवलेल्या अभ्यासाचा विसर पडू नये तसेच सुट्टीतही मनोरंजनातून शिक्षण मिळावे, या दुहेरी हेतूने जिल्हा परिषद शाळा वाडावेसरड केंद्र कळंबस्ते, (ता. संगमेश्वर ) या प्राथमिक शाळेत नारायण शिंदे यांनी अभिनय उपक्रम राबवला आहे. पॉवर पॉइंटचा उपयोग करून विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक गेम्स तयार केले. त्या गेम्सआधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला. 

कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत शासनाने शाळा बंद केली. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षादेखील रद्द केल्या. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आधी 50 टक्के शिक्षकांना रोटेशन पद्धतीने "वर्क फ्रॉम होम" चे आदेश दिले त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचा संपर्क तुटला आहे. तर परीक्षाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताणदेखील संपला आहे.

अशाही परिस्थितीत पालकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या पालकांचा ग्रुप तयार केला आहे. त्यावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतः तंत्रस्नेही शिक्षक नारायण शिंदे यांनी आपल्या मुलांसाठी पावर पॉइंटचा उपयोग करून विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक गेम्स तयार केले.

त्या गेम्सआधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला. यात पालकांचा सहभाग खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. यात शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, माजी विद्यार्थी यांचेही सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. दैनंदिन चित्र, कराओकेचा वापर करुन कविता गायन करणे, असे उपक्रम दैनंदिन घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास व्हॉट्‌सऍप ग्रुपवर पाठवत आहेत. कोरोनासंदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाबनदेखील करण्यात येत आहे. 

व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे प्रसार 

नारायण शिंदे यांनी तयार केलेले power point show games ते आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर वापर करत आहेतच पण संपूर्ण जिल्ह्यात तसेच आपल्या राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा या हेतूने ते व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे प्रसार करत आहेत. या अनोख्या व नावीन्य उपक्रमासाठी शिंदे यांचे रत्नागिरी जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, तालुक्‍याचे गटशिक्षणाधिरी त्रिभुवणे, जाधव, परब यांनी कौतुक केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Something Pleasant Student Study Based On Recreational Games