नववीत त्याने मिळवले जेमतेम ३५ टक्के मात्र दहावीच्या परीक्षेत मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

लादीकाम करणाऱ्याच्या मुलाला ९२ टक्के

बांदल स्कूलचे यश; सत्कार समारंभात पालक गहिवरले, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम

चिपळूण (रत्नागिरी) : येथील एल. एम. बांदल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत अनोखे यश संपादन केले. लादीकाम करणाऱ्याच्या मुलाने ९२.२० टक्के गुण मिळवले. दुसऱ्या शाळेतून नववीत ग्रेस मार्क मिळवून जेमतेम ३५ टक्के मिळवून बांदलमध्ये प्रवेश घेतलेला एक विद्यार्थी ८१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन आमदार भास्कर जाधव यांनी केला.

दहावीमध्ये शाळेत पहिला आलेला अरुणकुमार गुप्ता याचे वडील सूर्यकांत गुप्ता हे लादी बसविण्याचे काम करतात. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील. पोटापाण्यासाठी चिपळुणात आलेल्या गुप्ता यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी बांदल स्कूलमध्ये घातले. खासगी शिकवणी नसताना अरुणकुमार याने ९२ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले. सरदार अशरफ या विद्यार्थ्याने ८१ टक्के गुण मिळवले.

हेही वाचा- आता कोकणातल्या पर्यटन उद्योगासाठी आहे नामी संधी -

तो मूळचा खेड तालुक्‍यातला. तिथेच एका शाळेत त्याचे शिक्षण सुरू होते. पण नववीमध्ये ग्रेस मार्कांच्या आधारे तो कसाबसा उत्तीर्ण झाला. हे पाहून चिपळूण येथे राहणारे त्याचे आजोबा इब्राहिम दादरकर हे त्याला चिपळूणला घेऊन आले. त्याला दहावीमध्ये प्रवेश मिळावा, म्हणून सर्व शाळांमध्ये फिरले, पण कोणीही त्याला प्रवेश देत नव्हते. शेवटी ते बांदल स्कूलमध्ये आले आणि त्यांच्या नातवाला प्रवेश मिळाला. शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी इब्राहीम दादरकर यांना शाळेने आपल्या नातवामध्ये घडवून आणलेली प्रगती पाहून गहिवरून आले.

हेही वाचा-बापरे..! रत्नागिरीत या शहरात प्रत्येक भागात याचीच बाधा -

...तर विद्यार्थी बांदल स्कूलला
श्री. जाधव म्हणाले, ‘आजकाल विद्यार्थी नापास झाला तर शाळेच्या टक्केवारीवर परिणाम होईल, म्हणून तो किती हुशार आहे, त्याची कौटुंबिक परिस्थिती हे तपासूनच प्रवेश देतात. सगळीकडे फिरून प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी बांदल स्कूलला येतो. त्याला प्रवेश मिळतो. अशा विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम आमचे शिक्षक करतात, याचा मला अभिमान वाटतो, शिक्षणाचे पवित्रकार्य करताना कार्यपूर्तीचा आनंद व समाधान मिळत आहे.’

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son of the lady worker got 92.20 percent marks L M Students of Bandal School in the matriculation examination