दिव्यांगांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तु मिळणार आता ऑनलाइन

मकरंद पटवर्धन
Thursday, 22 October 2020

यंदा यात खंड पडण्याची भीती होती; परंतु या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, निदेशक, पालक आणि कार्यशाळा जोडलेले आहेत.

रत्नागिरी : सध्या सारे जग कोरोना महामारीच्या विळख्यात आहे. लॉकडाउन शिथिल झाला तरीही सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे दरवर्षी दिवाळीसाठी कलात्मक वस्तू निर्मिती आणि वस्तूंचे प्रदर्शन भरवणे शक्‍य नाही. त्यामुळेच आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थी घरी राहूनच कलात्मक वस्तू बनवण्यात दंग आहेत. या वस्तू ऑनलाइन विक्री करण्याचा संस्थेचा मानस आहे. याकरिता संस्थेची वेबसाइट अद्ययावत केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सी. ए. बिपिन शहा यांनी दिली.

हेही वाचा - गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी  : अनुदान बंद -

भिडे कार्यशाळा विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण निरंतर चालू राहण्याकरिता संपर्कात राहून त्यांच्याकडून दिवाळीसाठी कलात्मक वस्तू बनवून घेत आहे. वस्तू निर्मिती अचूक आणि सुबक होण्याच्या दृष्टीने कार्यशाळा निदेशक फोन, गृहभेटीच्या माध्यमातून, त्या कृतीचा प्रत्यक्ष व्हिडिओ तयार करून पालकांद्वारे विद्यार्थ्यांना पोहोचविला जात आहे. कच्चा माल पालकांना कार्यशाळेमध्ये बोलावून किंवा निदेशक विद्यार्थ्यांच्या घरी नेऊन त्यापासून करावयाच्या वस्तू निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आहेत.

प्रशिक्षणानुसार विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून प्रतिवर्षी विविध वस्तू तयार होतात. यंदा यात खंड पडण्याची भीती होती; परंतु या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, निदेशक, पालक आणि कार्यशाळा जोडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरच्या घरी आकाशकंदील, रंगबिरंगी आणि विविध आकाराच्या मेणबत्त्या, पणत्या, आयुर्वेदिक उटणे, उटणे वडी, लहान-लहान आकर्षक आकाशकंदील, शुभेच्छा पत्रे, फुले, प्रेझेंट पाकीट आदी वस्तू साकारत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे या वस्तू कार्यशाळेत उपलब्ध असून ऑनलाइनही घेता येतील.

हेही वाचा -  सावंतवाडीकर हेल्दी, आरोग्य सर्व्हे पूर्णत्वाकडे

"प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्तकला निर्मित वस्तू खरेदी करून आपला आणि आमच्या विद्यार्थ्यांचा आशेचा किरण आणखी तेजोमय करा."

- सचिन वायंगणकर, अधीक्षक

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special child create a new project of diwali like light lamp for diwali at home during lockdown in ratnagiri