कोकण व्हाया दुबई ; कोकणची कृषीकन्या झाली लखपती

प्रमोद हर्डीकर
Sunday, 25 October 2020

महिलांबरोबर पुरुषांना बरोबर घेऊन बचतगट स्थापन करून स्वतःसह अनेक कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे.

साडवली : संगमेश्‍वर तालुक्‍यातील धामणी येथे राहणारी ममता शिर्के हिने कृषी पदविका मिळवली. नोकरीच्या मागे न लागता नर्सरीची निर्मिती केली आणि महिलांबरोबर पुरुषांना बरोबर घेऊन बचतगट स्थापन करून स्वतःसह अनेक कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे. यामुळे तिचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - चालक कम बॉडीगार्ड अशा दुहेरी भूमिकेतील डेअरिंगबाज सारथी लतिका -

 ममता शिर्के या युवतीने वयाच्या २७ व्या वर्षी कठीण वाटणारे हे स्वप्न मेहनतीच्या जोरावर पूर्ण केले आहे. ममता हिने देवरूख येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले व पुढील पदवी शिक्षण मुंबईपर्यंत घेतले. मुंबईमध्ये तिला नोकरीही मिळाली होती; मात्र तिला दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे अवघडच वाटू लागले. स्वतः काहीतरी करावे, या उद्देशाने ती पुन्हा कोकणात धामणी येथे आली व तिने देवरूख येथील (कै.) मधु दंडवते कृषी विद्यालयात बीएससी ॲग्री पदवी मिळविली आणि नंतर दहीवली येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल खरवते येथून बीएससी हॉर्टिकल्चर पूर्ण केले.

वडिलांच्या सल्ल्यानुसार तिने शिक्षणकाळात मिळत असलेली १५ हजारांची स्कॉलरशिप यावर स्वतःच्या जागेत नर्सरी उभी केली. गेली चार वर्षे या नर्सरीच्या माध्यमातून ती १५ लाखांचे उत्पन्न मिळवत आहे. या नर्सरीमुळे अनेक महिलांना ममताने रोजगाराची संधी मिळवून दिली. धामणी परिसरातील महिलांना व पुरुषांना बरोबर घेऊन श्रीमंत बळीराजा सेंद्रिय शेती बचतगटाची स्थापना केली.

यासाठी सहा एकर जागा भाडे तत्त्वावर घेतली. यात गेली तीन वर्षे भाजीपाला तसेच कलिंगडाचे उत्पादन यातून पैसा मिळू लागला. गेल्या वर्षी ४५ टन कलिंगड उत्पादन मिळाले. यातील २५ टन कलिंगडे परदेशी दुबई येथे पाठविले. परदेशी कलिंगडे पाठविण्याची किमया जिल्ह्यात या एकमेव गटाने केली. यासाठी कृषी विभाग, तसेच आमदार शेखर निकम यांनी सहकार्य केले.

हेही वाचा -  सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी :  गुरुजींची अपार माया अन् त्यांच्याच साडीने सजते माहेरवासीनीची काया - ​
 

शेतीधर्म सोडला नाही..

लॉकडाउन काळात या बचतगटाला फार मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. दुकाने बंद होती व वाहतूक बंद होती. त्यामुळे बरेच नुकसान सहन करावे लागले होते. तरीही हार न मानता ममतासह सर्व टीमने यावर मात करत शेतीधर्म सोडला नाही.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story on 27 year lady forcing a watermelon for last year and 15 lakh rupees received in ratnagiri